IND vs AUS 4th Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही टेस्ट मॅच सुरु आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजाने 61 धावांची सलामी दिली. दोघे खेळपट्टीवर स्थिरावले होते. टीम इंडियाला आज विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार असं चित्र दिसत होतं.
त्यावेळी रविचंद्रन अश्विन टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. त्याने खेळपट्टीवर पाय रोवणाऱ्या ट्रेविस हेडला 32 रन्सवर रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद केलं. हेड अश्विनला फटकावण्याच्या नादात बाद झाला. त्याने 44 चेंडूत 32 धावा करताना 7 चौकार मारले.
शमीचा इनस्विंगर खाली राहिला
त्यानंतर 11 धावांच्या अंतराने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट मिळाली. मोहम्मद शामीने हे यश मिळवून दिलं. त्याने मार्नस लाबुशेनला 3 रन्सवर क्लीन बोल्ड केलं. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन इनिंगच्या 22 व्या ओव्हरमध्ये हे यश मिळवून दिलं. मोहम्मद शमीचा इनस्विंगर खाली राहिला. त्यावर स्ट्रोक खेळण्याच्या नादात लाबुशेन क्लीन बोल्ड झाला. या विकेटमुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. कारण त्यावेळी टीम इंडियाला विकेटची गरज होती.
आपलं कसब दाखवाव लागेल
नागपूर, दिल्ली आणि इंदोर या तिन्ही कसोटी सामन्यात खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून मोठा टर्न मिळत होता. अहमदाबादची विकेट तशी दिसत नाहीय. इथे चांगल्या धावा बनतील असं चित्र आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर गुंडाळण्यासाठी आपलं कसब दाखवाव लागेल. लंचला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 75 धावा झाल्या होत्या.
टीम इंडियात एक बदल
चौथ्या कसोटी सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने एक बदल केलाय. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश केलाय. तिसऱ्या कसोटी मोहम्मद शमीला विश्रांती देऊन उमेश यादवला संधी दिली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज टीम इंडियाचे प्रमुख् गोलंदाज आहेत. टेस्ट संपल्यानंतर वनडे सीरीज सुरु होणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांचा फिटनेस टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.
बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच WTC च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.