लंडन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी जी टीम सरस खेळणार, ते टेस्ट चॅम्पियन ठरणार. टीम इंडियाकडे आज इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. आज पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. टीम इंडियाने आज बाजी मारली, तर पुढची अनेक वर्ष या कामगिरीचे दाखले दिले जातील. इतरांच्या मनात विजयाची प्रेरणा निर्माण होईल. टीम इंडियाला विजयासाठी 280 धावांची गरज असून त्यांचे 7 विकेट शिल्लक आहेत.
ही टेस्ट मॅच असली, तर आज वनडेसारखं क्रिकेट खेळावं लागेल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना आज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेकडून भरपूर अपेक्षा आहेत. दोघे क्रीजवर नाबाद आहेत.
ऑस्ट्रेलियाची चिंता नक्कीच वाढेल
टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे पाचव्या दिवसाचे आकडे पाहिले, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात. मागच्या 10 वर्षात विराट कोहलीने टेस्ट मॅचच्या पाचव्यादिवशी तीनवेळा 100 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. अन्य कुठल्याही फलंदाजाला पाचव्यादिवशी कोहलीसारखं खेळणं जमलेलं नाही.
कुठल्या देशांविरुद्ध कोहलीची पाचव्यादिवशी शतकं
विराट कोहलीने 2014 साली एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 141 धावा केल्या होत्या. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध कोहलीने 2014 मध्ये 105 धावा केल्या होत्या. 2017 मध्ये कोहलीने कोलकात्यात श्रीलंकेविरुद्ध 104 धावा केल्या होत्या.
आतापर्यंत पाचव्यादिवशी कोहलीने किती धावा केल्यात?
कोहलीने टेस्ट मॅचच्या पाचव्यादिवशी 14 इनिंगमध्ये एकूण 696 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 69.60 होती. कोहली WTC फायनल मॅचच्या चौथ्या दिवशी 44 धावांवर नाबाद आहे. पाचव्या दिवशी शतकी खेळी साकारुन कोहलीचा टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.