मुंबई : टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच एस श्रीधर यांनी आपलं पुस्तक ‘कोचिंग बियाँड’मध्ये टीम इंडियासोबतचे आपले अनुभव शेअर केलेत. या पुस्तकातून श्रीधर यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल एक मोठा खुलासा केलाय. त्यांनी आपल्या पुस्तकात एक गोष्ट लिहीली आहे, ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. श्रीधर यांनी 2019 सालच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा सांगितला आहे. बुमराहने या दौऱ्यात बॉलिंग कोच भरत अरुण यांना एक वेगळीच गोष्ट सांगितली होती.
बुमराह थकला होता
वर्ष 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीज झाली. भारताने त्या सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडी मिळवली होती. सीरीजचा शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळला गेला. सामना ड्रॉ च्या दिशेने जात होता. तीन दिवस गोलंदाजी करणारा बुमराह थकला होता. त्याने गोलंदाजी कोच भरत अरुण यांच्याकडे जाऊन मला धीम्या गतीने गोलंदाजी करायची आहे असं सांगितलं.
कोचकडे जाऊन बुमराह काय म्हणाला?
मॅचच्या दरम्यान बुमराह कोच अरुण यांच्याजवळ गेला व त्यांना सांगितलं की, “सर, या विकेटमध्ये जीव नाहीय. वेगवान बॉलर्ससाठी या पीचमध्ये काही नाहीय. मी खूप थकलोय. शारीरिक आणि मानसिक दृष्टया थकलोय. सीरीजबद्दल बोलायच झाल्यास, ही सीरीज आधीच जिंकली आहे. हा सामना ड्रॉ होणार आहे. त्यामुळे मी थोड्या धीम्या गतीने गोलंदाजी करेन”
अरुण यांनी दिले दोन पर्याय
अरुण यांनी बुमराहच म्हणणं ऐकून घेतलं, त्यानंतर दोन ऑप्शन दिले. “तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. तू धीमी गोलंदाजी करु शकतोस. 130-132 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतोस. ही टेस्ट संपव व घरी जाऊन रिकव्हर हो. त्यानंतर वर्ल्ड कपच्या तयारीला लाग”
दुसरा पर्याय असा आहे की, “तू चार-पाच ओव्हर टाक. त्यात बॅट्समनला काहीही करण्याची संधी देऊ नकोस. टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी जीव नसलेल्या खेळपट्टीवर हे करु शकतोस हे त्यातून दिसून येईल. जेव्हा तू पुन्हा या खेळाडूचा सामना करशील, तेव्हा तुझा आत्मविश्वास वाढलेला असेल. मानसिक दृष्टया त्या प्लेयरवर दबाव असेल”