IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट आहे. कमिन्स कदाचित चौथ्या कसोटी सामन्यात सुद्धा खेळताना दिसणार नाही. पॅट कमिन्सच्या कुटुंबातील सदस्याची तब्येत खराब असल्याने त्याने भारत दौरा अर्धवट सोडून तात्काळ मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतणार असल्याच वृत्त आलं, त्यावेळी तो तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परत येईल, असं म्हटलं जात होतं. पण आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. चौथ्या कसोटीतही कमिन्स खेळण्याची शक्यता धूसर दिसतेय.
कोण आजारी आहे?
पॅट कमिन्सची आई मारिया कमिन्स आजारी आहेत. बऱ्याच काळापासून त्यांचा कॅन्सरशी संघर्ष सुरु आहे. त्या आता आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अखेरच्या दिवसात आईची काळजी घेण्यासाठी कमिन्स मायदेशी परतला आहे. पॅट कमिन्स संपूर्ण सीरीजला मुकू शकतो. आईमुळेच त्याने आयपीएल 2023 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ टीमच नेतृत्व करणार आहे.
निर्णय घेण्याआधी कमिन्स कोणाशी बोलला?
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला मायदेशी परतण्याची किंवा टीमसोबत तिथेच थांबण्याचा चॉइस दिला होता. पॅट कमिन्स टीममधील सहकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तो तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतणार होता. कमिन्सच्या आई ब्रेस्ट कॅन्सरने आजारी आहे. त्याने आईसोबतच तिथे थांबण्याचा निर्णय घेतला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाची या दौऱ्यात पुरती वाट लागली आहे. त्यांचे अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. कमिन्सच नाही, डेविड वॉर्नर, एश्टन एगरही मायदेशी परतलाय. जोश हेझलवूडही दुखापतीमुळे खेळणार नाहीय. ऑस्ट्रेलियाची सर्व बाजूने कोंडी झालीय. त्यात आता नेतृत्वाची जबाबदारी स्मिथच्या खांद्यावर येऊन पडलीय.