IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन टीम बंगळुरुमध्ये पोहोचेल. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कुठलीही टीम परदेशात कसोटी मालिका खेळण्यासाठी जाते, तेव्हा ती टीम सर्वप्रथम प्रॅक्टिस मॅच खेळते. परदेशातील खेळपट्टया, वातावरण याचा अंदाज यावा, हा प्रॅक्टिस मॅचमागे उद्देश असतो. भारत दौऱ्यावर येणारी ऑस्ट्रेलियन टीम एकही प्रॅक्टिस मॅच खेळणार नाहीय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू इयान हिलीने प्रॅक्टिस मॅच न खेळण्यामागच कारण सांगितलंय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बीसीसीआयवर अजिबात विश्वास नाहीय.
उस्मान ख्वाजा काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियन टीमचा स्टार बॅट्समन उस्मान ख्वाजाने अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं. भारतात सराव सामना खेळण्याचा काहीही अर्थ नाहीय, असं उस्मान ख्वाजाने म्हटलं होतं. “मुख्य सामन्यासाठी जशी विकेट असते, तशी विकेट भारत प्रॅक्टिस मॅचसाठी तयार करत नाही. हे विश्वास मोडण्यासारखं आहे. त्यामुळे सराव सामना खेळण्यात अर्थ नाही” असं ख्वाजाने म्हटलं होतं.
हिलीला बीसीसीआयवर विश्वास नाही
हिलीने ख्वाजाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. “दौऱ्यावर रवाना होण्याआधी स्पिनर्सना भारतात कशा खेळपट्टया आहेत, त्या पीचचा अनुभव मिळणं आवश्यक होतं” असं हिली म्हणाला. “आम्ही सिडनीमध्ये स्पिनर्सना एकत्रित केलं. इथे स्पिनर्सना उपयुक्त ठरणारी खेळपट्टी बनवली. त्यांना सराव दिला. आम्ही ज्या गोष्टींचा आग्रह धरलाय, त्या सुविधा बीसीसीआय आम्हाला भारतात उपलब्ध करुन देईल, यावर विश्वास नाहीय” असं हिली सोमवारी एसईएन रेडिओवर म्हणाला.
यजमान देश विश्वास मोडतात
“दौऱ्यावर प्रॅक्टिस मॅचसाठी आणि मुख्य सामन्यासाठी वेगवेगळी विकेट तयार करण्याची पद्धत मान्य नाही” असं हिली म्हणाला. हे विश्वास मोडण्यासारख आहे, असं तो म्हणाला. “क्रिकेटच्या मैदानात सर्वश्रेष्ठ आणि उदयोन्मुख क्रिकेटर्सना संधी आणि अनुभव मिळाला पाहिजे. आपलं लक्ष त्यावरुन विचलित झालय” असं हिलीने सांगितला.
पहिला कसोटी सामना कुठे?
“क्रिकेट खेळणारे देश अशा पद्धतीने परस्परांचा विश्वास मोडतात, हे पाहणं खूप निराशाजनक आहे. हे थांबवण्याची गरज आहे” असं हिली म्हणाला. येत्या 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. सीरीजमधला पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला 2004-05 नंतर भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.