IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियासाठी भारत दौरा निराशाजनक ठरलाय. पहिल्या दोन कसोटीत त्यांचा दारुण पराभव झाला. अवघ्या तीन दिवसात दोन्ही कसोटी निकाली निघाल्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच राहणार हे स्पष्ट आहे. चार कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. सीरीजच्या मध्यावर ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू मायदेशी परतणार असल्याचं वृत्त आहे. यात 5 पैकी 2 खेळाडू पुन्हा परत येणार नाहीयत. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स कौटुंबिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्याच्यासोबत सलामीवीर डेविड वॉर्नर आणि जोश हेझलवूड सुद्धा मायदेशी परतणार असल्याचा वृत्त आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी दरम्यान 10 दिवसाचा वेळ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कमिन्स या काळात सिडनीला जाणार आहे. पण तिसरी कसोटी सुरु होण्याआधी तो मायदेशी परतेल.
ऑस्ट्रेलियन गोटात खळबळ
कमिन्स मायदेशी परतणार असल्याची बातमी आली. त्यानंतर आता वॉर्नर आणि हेजलवूडही मायदेशी रवाना होणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोटात खळबळ उडालीय. हेजलवूड अजूनपर्यंत दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाहीय. सिडनी कसोटीत मागच्या महिन्यात त्याला दुखापत झाली होती. आता तो पूर्ण सीरीजसाठी बाहेर होणार असल्याच वृत्त आहे.
करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा दौरा होता
डेविड वॉर्नरला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याडावात दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. वॉर्नरसाठी भारत दौरा त्याच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. त्याच करिअर धोक्यात असल्याच बोलल जातय. वॉर्नरसाठी भारत दौरा करिअर वाचवण्यासाठी एक चांगली संधी होती. पण सीरीजच्या पहिल्या कसोटीत त्याने फक्त 11 धावा केल्या.
मायदेशी परतणारे आणखी दोन खेळाडू कोण?
दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 15 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या कोपराला दुखापत झाली. त्यातून तो अजूनपर्यंत सावरलेला नाही. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, एश्टन एगर आणि मॅट रेनशॉ यांना सुद्धा घरी पाठवलं जाऊ शकतं. रेनशॉने मागच्या मॅचमध्ये मध्यावर वॉर्नरला रिप्लेस केलं होतं.