ढाका: टीम इंडियाचा पहिल्या वनडेमध्ये पराभव झाला आहे. बांग्लादेश आणि भारतामध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. बांग्लादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 187 धावांच लक्ष्य दिलं होतं. बांग्लादेशने 46 व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं.
एकट्याने मॅच फिरवली
मेहदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या विकेटसाठी मुस्तफिजूर रहमानला साथीला घेऊन त्याने अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. मेहदी हसन मिराजने एकट्याने मॅच फिरवली. बांग्लादेशने एक विकेटने मॅच जिंकली. शेवटच्या विकेटसाठी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफीजूर रहमानमध्ये 51 धावांची भागीदारी झाली. मेहदी हसन मिराजने 39 चेंडूत नाबाद 38 आणि रहमानने नाबाद 10 धावा केल्या.
फलंदाजीत टीम इंडियाच सरेंडर
टीम इंडियाने आज बांग्लादेशसमोर पहिल्या वनडेमध्ये सरेंडर केलं. 52 चेंडू बाकी असताना टीम इंडियाचा डाव संपुष्टात आला. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाकडून कोणी अशा कामगिरीची अजिबात अपेक्षा केली नव्हती. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू टीममध्ये असताना, मोठी धावसंख्या उभारली जाईल अशी अपेक्षा होती. पण बांग्लादेशी गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. फक्त केएल राहुल एकटा लढला. त्याने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाचा डाव 186 धावांवर संपुष्टात आला.
गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
टीम इंडियाने बांग्लादेशल विजयासाठी फार मोठ लक्ष्य दिलं नव्हतं. त्यामुळे बांग्लादेशची टीम सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांनी बांग्लादेशला धक्के दिला. पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरने सलामीवीर नजमल होसेनला शुन्यावर आऊट केलं. त्यानंतर काही वेळाने अनामुल 14 धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मेहदी हसन मिराजने टीम इंडियाकडून विजयाचा घास हिरावला
एकवेळ 136 धावात बांग्लादेशच्या 9 विकेट गेल्या होत्या. टीम इंडिया पहिला वनडे सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची आणि बांग्लादेशला 51 धावांची गरज होती. त्यावेळी मेहदी हसन मिराजने जे केलं, त्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. त्याने मुस्तफीजूर रहमानला साथीला घेऊन फक्त चौकार मारुन बांग्लादेशला विजयाच्या समीप नेलं. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहरने सुरुवातीपासून जबरदस्त गोलंदाजी केली होती. पण अखेरच्या काही षटकांमध्ये त्यांची गोलंदाजी ढेपाळली. मेहदी हसनने त्यांच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केले.
TOYAM Sports Limited ODI Series: Bangladesh vs India: 1st ODI
Bangladesh won by 1 wicket#BCB | #Cricket | #BANvIND pic.twitter.com/TWbnJVEA8V— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 4, 2022
बांग्लादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब
शार्दुल ठाकूरच्या 43 व्या ओव्हरमध्ये विकेटकीपिंग करणाऱ्या केएल राहुलने मेहदी हसनचा झेल सोडला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने उडालेला झेल वॉशिंग्टन सुंदरने पकडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर मेहदी हसनने कुठलीही संधी दिली नाही. त्याने 39 चेंडूत नाबाद 38 आणि रहमानने नाबाद 10 धावा करुन बांग्लादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.