चटोग्राम: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये चटोग्राम येथे कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटीचा तिसरा दिवस होता. या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये आहे. बांग्लादेशची टीम बॅकफूटवर आहे. आज कसोटीच्या शेवटच्या सत्रात गोलंदाजांना यश मिळालं नाही. पण अजून या कसोटीचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे कसोटी विजयाची संधी आहे.
फॉलोऑन दिला नाही
आज सकाळी कालच्या 8 बाद 133 धावांवरुन बांग्लादेशच्या डावाला सुरुवात झाली. आणखी 17 धावांची भर घातल्यानंतर बांग्लादेशचा डाव 150 रन्सवर आटोपला. टीम इंडियाने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला.
कॅप्टन राहुल अपयशी
कॅप्टन केएल राहुल आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. राहुल आज पुन्हा अपयशी ठरला. तो 62 चेंडूत 23 रन्सवर आऊट झाला. यात 3 चौकार होते. गिल आणि राहुलने 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि गिलची जोडी जमली. दोघांनी आज शतक झळकावली.
गिल-पुजाराच शतक
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. त्याने 152 चेंडूत 110 धावा करताना 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. शतकानंतर गिल वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर पुजाराने शतक झळकावलं. पुजाराने तब्बल 3 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्याने याआधी 2019 मध्ये शेवटच शतक झळकावलं होतं. पुजाराने 130 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. यात 13 चौकार होते. पुजाराच्या शतकानंतर केएल राहुलने 2 बाद 258 धावांवर डाव घोषित केला. विराट कोहली 19 धावांवर नाबाद होता.
अखेरच्या सत्रात टीम इंडियाला यश नाही
टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच टार्गेट दिलं आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना अखेरच्या सत्रात यश मिळालं नाही. तिसऱ्यादिवस अखेर बांग्लादेशच्या बिनबाद 42 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशची टीम अजून 471 धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवर नजमुल शांटो 25 आणि झाकीर हसने 17 धावांवर खेळतोय. टीम इंडियाकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 5, मोहम्मद सिराजने 3, उमेश यादव-अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतला.