ढाका: टीम इंडिया सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे. पहिली टेस्ट टीम इंडियाने 188 धावांनी जिंकली. दुसऱ्या आणि अखेरच्या टेस्ट मॅचआधी महत्त्वाची अपडेट आलीय. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. तो अंगठ्याच्या दुखापतीमधून अजून पूर्णपणे सावरलेला नाहीय. रोहितला वनडे सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. दुसऱ्या टेस्टआधी तो फिट होईल अशी अपेक्षा होती, पण असं घडलं नाही. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.
एब्डॉमिनल स्ट्रेनचा त्रास
रोहितच नाही, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतीमुळे टेस्ट सीरीजमधून बाहेर गेलाय. नवदीन सैनीला एब्डॉमिनल स्ट्रेनचा त्रास होत असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. तो बंगळुरुत एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करेल.
प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
22 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल टीम इंडियाच नेतृत्व करेल. दुसऱ्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.
12 वर्षानंतर टेस्ट टीममध्ये संधी
डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट टीममध्ये दाखल झालय. या खेळाडूला 12 वर्षानंतर कसोटी सामन्यात संधी मिळाली आहे. पण दुसऱ्या कसोटीत उनाडकटचा समावेश होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
ही कसोटी का महत्त्वाची?
टीम इंडियाचा पुढचा सामना ढाकाच्या शेरे-बांग्ला स्टेडियमवर होईल. टीम इंडियाकडे इथे सीरीज जिंकण्याची संधी असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.