मुंबई: मँचेस्टर मध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर (IND vs ENG) जबरदस्त विजय मिळवला. रविवारी तिसऱ्या वनडे मध्ये भारताने रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शिखर धवन हे महत्त्वाचे विकेट गमावले होते, तरी हार मानली नाही. भारताकडून हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि ऋषभ पंतने (Rishabh pant) कमालीची फलंदाजी केली. दोघांच्या फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडवर 2-1 ने मालिका विजय मिळवता आला. हार्दिक पंड्याने काल बॉल आणि बॅट दोघांनी कमाल दाखवली. हार्दिकने 7 ओव्हर्समध्ये 24 धावा देऊन 4 विकेट काढल्या. नंतर 55 चेंडूत 71 धावा फटकावल्या. पंतसोबत शतकी भागीदारी करुन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने चौफेर फटकेबाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला अनेकदा हुक फटक्याच्या मोहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने जमिनी लगत फटके खेळले. त्याने पंचवर खूप सुंदर पद्धतीने चौकार वसूल केले.
याच कामगिरीसाठी हार्दिक पंड्याला मालिकावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने स्वत:ला बेशर्म म्हटलं. सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी हार्दिक पंड्याला लियाम लिव्हिंगस्टोनला सातत्याने शॉर्ट पीच चेंडू टाकण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, “मी बेशर्म गोलंदाज आहे. भले 6 चेंडूत मला 6 षटकार बसले, तरी मी माझ्या प्लानवर कायम असतो. कारण मला विकेट हवी असते” पंड्या म्हणाला की, “मला शॉर्ट चेंडू टाकायला आवडतात. माझ्याविरोधात जो फटका खेळतो, ते मला संधी देतात. मला विकेट मिळणार असेल, तर मला 6 सिक्स खाऊन फरक पडत नाही”
लिव्हिंगस्टोन गोलंदाजी करण्याबद्दल पंड्या म्हणाला की, “तो सातत्याने धोका पत्करतो. तीच त्याच्या खेळण्याची स्टाइल आहे. मी बेशर्म आहे. मला फरक पडत नाही. कोणी कितीही लांब सिक्स मारुं दे”
Amazing series win ?? Thanks for all the love and support ❤️ pic.twitter.com/sJPR6fPMMV
— hardik pandya (@hardikpandya7) July 17, 2022
हार्दिक पंड्याने वनडे सीरीजच्या दोन सामन्यात 100 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा जास्त होता. त्याशिवाय पंड्याने 6 विकेटही काढले. त्याचा इकॉनमी रेट 4.35 होता. पंड्याने संघात पुनरागमन केल्यापासून आपल्या खेळात जबरदस्त सुधारणा केली आहे. तो आता संघासाठी मॅच विनरची भूमिका बजावतोय. पंड्याची अशीच कामगिरी पुढेही सुरु राहिल, अशी अपेक्षा आहे. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कप मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असेल.