मुंबई: मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (T 20 Match) इंग्लंडला (IND vs ENG) विजय मिळाला. पण त्यासाठी सुद्धा इंग्लंडला संघर्ष करावा लागला. इंग्लंडने हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताचा डाव 198 धावात आटोपला. इंग्लंडच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला, त्याचं कारण आहे फक्त (Suryakumar Yadav) सूर्यकुमार यादव. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 215 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 216 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. भारताने इंग्लंडला शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजवलं. सूर्यकुमार यादवने तर इंग्लंडच्या तोंडच पाणी पळवलं होतं. तो खेळपट्टीवर असेपर्यंत इंग्लंडचा संघ दबावाखाली होता.
सूर्यकुमार यादव आज नॉटिंघमच्या मैदानावर करीयरमधील सर्वोत्तम खेळी खेळला. त्याने 55 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात 14 चौकार आणि 6 षटकार आहेत. त्याने इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही. चौफेर फटकेबाजी केली. खोऱ्याने धावा लुटल्या. रोहित शर्मा, (11) विराट कोहली,(11) ऋषभ पंत (1) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अवघ्या 31 धावात तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी सूर्यकुमारने श्रेयस अय्यरच्या साथीने डाव सावरला.
दोघांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 28 धावांवर आऊट झाला. त्यानंतर क्रीझवर आलेल्या दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा यांच्यावर वेगाने धावा फटकावण्याची जबाबदारी होती. त्यात कार्तिक (6) आणि जाडेजा (7) धावांवर आऊट झाला. या दोघांपैकी एक जण जरी शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर असता किंवा स्वत: सूर्यकुमार यादव असता, तर सामन्याच्या निकालाच चित्र वेगळं दिसलं असतं.
मोइन अलीच्या पहिल्या तीन चेंडूवर सूर्यकुमारने 14 धावा वसूल केल्या होत्या. पण मोठा फटका खेळणं आवश्यक होतं. त्यामुळे सूर्यकुमार त्याच्या गोलंदाजीवर सॉल्टकरवी झेलबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी थोडी अजून चांगली गोलंदाजी केली असती, तर भारताने मालिकेत क्लीन स्वीप केलं असतं. पण रवींद्र जाडेजा, उमरान मलिक आणि आवेश खान यांची इंग्लंडच्या फलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार आज खेळत नव्हते. त्याचा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. इंग्लंडकडून डेविड मलानने भारतीय गोलंदाजांनी भरपूर धुलाई केली. त्याने 77 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.