मुंबई: टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) जर्मनीहून एक चांगली बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रोइनच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी म्हणून राहुल जर्मनीला रवाना झाला होता. त्याच्या सोबत गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya shetty) सुद्धा आहे. राहुलने आता सोशल मीडियावर त्याच्यावरील सर्जरीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय चाहते नक्कीच यामुळे खुश होतील. केएल राहुलने आपल्या हसऱ्या चेहऱ्याचा एक फोटो शेयर केलाय. “मागचे काही महिने माझ्यासाठी कठीण होते. पण माझ्यावरील शस्त्रक्रिया (Surgery) यशस्वी झाली आहे. आता माझी चांगली रिकव्हरी सुरु आहे. तुमचे मेसेज आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी तुमचा आभारी आहे” असं केएल राहुलने टि्वटमध्ये म्हटलं आहे.
राहुलच्या या पोस्टवर त्याचे मित्र आणि टीम इंडियातील खेळाडू हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रोहितची बायको रितिका सजदेह आणि अथियाचा भाऊ अहान शेट्टीने कमेंट करुन लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल अजून काही काळ जर्मनीमध्ये रहाणार आहे.
मागच्या आठ महिन्यात सातत्याने दुखापती झाल्यामुळे केएल राहुल पाच सीरीज खेळू शकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेसाठी त्याला कॅप्टन बनवण्यात आलं होतं. कारण रोहित शर्माला विश्रांती दिली होती. पण पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यावेळी ऋषभ पंतकडे कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवण्यात आली. आधी राहुलची दुखापत सामान्य वाटली होती. पण नंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत तो खेळणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तो संपूर्ण इंग्लंड दौऱ्यालाच मुकणार असल्याचं कळलं. त्यावरुन राहुलची दुखापत किती गंभीर आहे, ते स्पष्ट झालं.
Hello everyone. It’s been a tough couple of weeks but the surgery was successful. I’m healing and recovering well. My road to recovery has begun. Thank you for your messages and prayers. See you soon ?♥️ pic.twitter.com/eBjcQTV03z
— K L Rahul (@klrahul) June 29, 2022
केएल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध राहू शकतो. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.