IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल तिसऱ्या सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. त्याला चेतेश्वर पुजाराने 45 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 तर मोईन अलीने 2 विकेट घेतल्या. दरम्यान अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ अर्धा तास आधी थांबवण्यात आला.
इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉनी बर्न्स याने काल 49 धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा चांगलाच कस लागला. रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. मात्र पुन्हा एकदा रुटने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली.
लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली, तर राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही तो स्वस्तात बाद झाला. पुजारानंतर विराट (42), रिषभ पंत (37) आणि जाडेजाने (40) काही वेळ प्रतिकार केला. परंतु भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या डावातही भारताची भिस्त रोहित-राहुल या जोडीवर असणार आहे.
अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. (181/6)
भारताने सहावी विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद. मोईन अलीने त्याला त्रिफळाचित केलं. (भारत 175/6)
अजिंक्य रहाणे बाद झाला आहे.
त्याने 146 चेंडूमध्ये एकूण 61 धावा केल्या.
भारताने आपली चौथी विकेट गमावली आहे. सुरुवातीपासून संयमी खेळ करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मार्क वूडने 45 धावांवर असताना जो रुटकरवी झेलबाद केलं. (155/4)
संघ अडचणीत असताना अजिक्यं रहाणेने अर्धशतक झळकावत या सामन्यातील भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. 68 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर सॅम करनला शानदार चौकार लगावत रहाणेने अर्धशतक झळकावलं. अजिंक्यने 125 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा जमवल्या आहेत. (भारत 139/3)
तिसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. चेतेश्वर पुजारा (29) आणि अजिंक्य रहाणे (24) या जोडी मैताात उतरली आहे. (भारत 15/3)
कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला आहे. मात्र आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने संघर्षपूर्ण अर्धशतकीय भागीदारी करत धावफलकावर भारताचं शतक झळकावलं आहे. त्यामुळे भारताला 78 धावांची आघाडी मिळाली आहे.
चेतेश्वर पुजारा (29) आणि अजिंक्य रहाणे (24) या जोडीने चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 175 चेंडूत 50 धावांची भागीदारी रचली आहे.
51 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सॅम करनच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावत चेतेश्वर पुजाराने धावफलकावर भारताचं शतक (103) झळकावलं आहे. त्यामुळे भारताला 76 धावांची आघाडीदेखील मिळाली आहे.
3 बाद 55 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाची स्थिती बिकट आहे. मात्र चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे इंग्लंडच्या गोलंदाजांचा प्रतिकार करत आहेत. या दोघांनी 98 चेंडूत 22 धावांची भागीदारी करत धावफळकावर 77 धावा लावल्या आहेत. त्यामुळे भारताला 50 धावांची आघाडी मिळाली आहे.
55 धावांमध्ये 3 विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला आहे. लंचनंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. पुजारा-रहाणे जोडी मैदानात परतली आहे.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. 25 षटकात त्यांनी भारताचे तीन महत्वपूर्ण फलंदाज (रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली) बाद करत केवळ 56 धावा दिल्या.
भारत या सामन्यात अडचणीत सापडला आहे. भारताने कर्णधार विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. 20 धावांवर असताना सॅम करनने कोहलीला यष्टीरक्षक सॅम करनकरवी झेलबाद केलं. (भारत 55/3)
कर्णधार विराट कोहलीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 21 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावत कोहलीने धावफलकावर भारताचं अर्धशतक झळकावलं आहे. कोहलीने चार चौकारांच्या सहाय्याने 20 धावा फटकावल्या आहेत. (भारत 21 षटकात 3 बाद 52)
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. जलदगती गोलंदाज मार्क वूडने रोहितला सीमारेषेवर उभ्या मोईन अलीकरवी झेलबाद केलं. रोहितने 21 धावांचं योगदान दिलं. (भारत 27/2)
भारताने पहिली विकेट गमावली आहे. मार्क वूडने सलामीवीर लोकेश राहुलला 5 धावांवर असताना यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 18/1)
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ही जोडी मैदानात उतरली आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने चेंडू जेम्स अँडरसनच्या हाती सोपवला आहे.