नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना पावसामुळे मध्यावरच थांबवावा लागला. पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. डकवर्थ लुईस नियमानुसार ही मॅच टाय झाली. टीम इंडियाने तीन टी 20 सामन्याची सीरीज 1-0 ने जिंकली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने 65 धावांनी जिंकला होता.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली दुसरी सीरीज जिंकली
आज न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 9 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसरी टी 20 सीरीज जिंकली आहे. याआधी आयर्लंड विरुद्ध सीरीज जिंकली होती.
भारताची निराशाजनक सुरुवात
भारताला आज चांगली सुरुवात मिळाली नाही. 21 रन्समध्ये ऋषभ पंत, इशान किशन आणि श्रेयस अय्यर बाद झाले. इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर चॅपमॅनकरवी झेलबाद झाला. मिल्नेने ही विकेट काढली. त्याने 10 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.
ऋषभ पंतने साऊदीच्या गोलंदाजीवर सोढीकडे झेल दिला. त्याने 5 चेंडूत 11 धावा केल्या. श्रेयस अय्यरही पहिल्याच चेंडूबाद बाद झाला. त्याने स्लीपमध्ये नीशॅमकडे झेल दिला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या.
सूर्या लवकर आऊट झाला
सूर्यकुमार आणि हार्दिक भारताच्या डावाला आकार देत होता, तेव्हा सूर्या ईश सोढीच्या गोलंदाजीवर त्याने फिलिप्सकडे सोपा झेल दिला. सूर्याने 10 चेंडूत 13 धावा केल्या. 9 ओव्हरमध्ये खेळ थांबवला, तेव्हा भारताच्या 4 बाद 75 धावा झाल्या होत्या. पंड्या 30 आणि हुड्डा 9 रन्सवर खेळत होता.
सिराज-अर्शदीपने न्यूझीलंडची वाट लावली
20 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स मैदानावर असे पर्यंत न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण हे दोघ आऊट होताच न्यूझीलंडचा डाव गडगडला. दोघांनी 86 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराज आणि अर्शदीपने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. 146 ते 149 दरम्यान न्यूझीलंडने 6 विकेट गमावल्या. दोघांनी न्यूझीलंडची वाट लावली.