IND vs NZ 1st ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना आज होणार आहे. सीरीज सुरु होण्याआधी काल टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या रुपाने मोठा झटका बसला. श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे या संपूर्ण सीरीजमध्ये खेळणार नाहीय. टीम इंडियानंतर आता न्यूझीलंडलाही झटका बसलाय. त्यांचा स्टार स्पिनर ईश सोढी पहिल्या वनडेमध्ये खेळणार नाहीय. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमने ही माहिती दिली.
नेट्समध्ये सरावासाठी उतरला, पण….
“दुर्देवाने ईश सोढीला दुखापत झालीय. तो पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नसेल. पुढच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकेल, अशी अपेक्षा आहे” असं लॅथम म्हणाला. सोढी मंगळवारी नेट्समध्ये सरावासाठी उतरला होता. पण दुखापतीमुळे त्याने गोलंदाजीवर जास्त भर दिला नाही. टॉम लॅथमने जास्त वेळ नेट्समध्ये घालवला. तो फिरकी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळतो.
टीममध्ये स्थान मिळालेल्यांसाठी ही एक संधी
“बोल्ट, साऊथी, विलियमसन टीममध्ये नाहीयत. त्यांची उणीव आम्हाला जाणवेल. त्याचवेळी टीममध्ये स्थान मिळालेल्या अन्य खेळाडूंसाठी ही एक संधी आहे. टीममध्ये असलेले सर्वच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. आता जबाबदारी घेण्याची वेळ आहे. सुदैवाने आमच्याकडे लॉकी फर्ग्युसन आहे, त्याच्याकडे भारतात क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे” असं टॉम लॅथम म्हणाला.
न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाजीची धुरा कोण संभाळणार?
फर्ग्युसन न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळेल. ब्लेयर टिकनर, डग ब्रेसवेल आणि हेनरी शिपले हे गोलंदाज साथ देतील. सीनियर स्पिनर ईश सोढीला हल्की दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिल्या वनडेत खेळणार नाहीय. पाकिस्तानात 2-1 ने सीरीज जिंकून न्यूझीलंडची टीम भारतात आली आहे.
पहिल्या वनडेसाठी न्यूजीलंड टीम:
टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, डग ब्रेसवेल, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, हेनरी शिपले, ब्लेयर टिकनर.