मुंबई: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या सीरीजआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. भारताचा अव्वल फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या सीरीजना मुकणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी श्रेयस अय्यर या सीरीजमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. अय्यरच्या पाठीला दुखापत झालीय. तो आता नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये जाईल. अय्यरच्या जागी रजत पाटीदारचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
अय्यर बाहेर गेल्यामुळे ‘या’ खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये स्थान
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना हैदराबादमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना रायपूर आणि तिसरा सामना इंदूर येथे होईल. अय्यर बाहेर गेल्यामुळे सूर्यकुमार यादवला तिन्ही वनडे सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
श्रीलंके विरुद्ध सीरीजमध्ये अय्यरने किती धावा केल्या?
सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या 3 वनडे सामन्यांपैकी 2 मॅचमध्ये संधी मिळाली नाही. अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये टीमचा महत्त्वाचा भाग होता. तीन सामन्यात तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत 28, दुसऱ्या मॅचमध्ये 28 आणि तिसऱ्या वनडेत 38 रन्स केल्या.
रजत पाटीदार फुल फॉर्ममध्ये
श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदाराचा समावेश करण्यात आलाय. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहे. मागच्यावर्षी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध प्लेऑफमध्ये त्याने सेंच्युरी झळकवली होती. त्याच्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला विजय मिळाला. 51 लिस्ट ए सामन्यात त्याने 97.45 च्या स्ट्राइक रेटने 3 सेंच्युरी आणि 8 अर्धशतक झळकवली. एकूण 1648 धावा केल्या. रणजी ट्रॉफीत तो मध्य प्रदेशकडून खेळतो. मागच्या 7 सामन्यात त्याने 6 हाफ सेंच्युरी आणि एक सेंच्युरी झळकवली आहे. या कमालीच्या प्रदर्शनाच त्याला आता इनाम मिळालय.
टीम इंडियाचा वनडे स्क्वॉड:
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, रजत पाटीदार, वॉशिंगटन सुंदर, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक