मुंबई: भारताने परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) दिमाखदार विजय मिळवला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला. आशिया चषक (Asia cup) स्पर्धेची भारताने शानदार सुरुवात केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने सव्याज परतफेड केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मोहम्मद नवाजने लास्ट ओव्हर टाकली. अपेक्षेप्रमाणे भारत पाकिस्तान सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत चाहते टेन्शनमध्ये होते.
मोहम्मद नवाजच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजा आऊट झाला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव निघाली. चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. हार्दिकने पुढचा चेंडू निर्धाव खेळून काढला. 3 चेंडूत विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. त्यावेळी हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मैदान कोई भी हो, इनसे जितना हमेशा खास होता है।#IndiaVsPak #AsiaCup2022
— Ram Satpute (@RamVSatpute) August 28, 2022
हार्दिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला खरा, पण सामना त्याआधीच्या 19 व्या षटकात फिरला. 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. हॅरिस रौफ 19 वी ओव्हर टाकत होता. त्या षटकात पंड्याने तीन चौकार मारले. पहिला चौकार मारताना अंदाज चुकला. पण चेंडू सीमारेषेपार केला. त्यानंतर मात्र दोन ठरवून कडक फोर मारले. तिथे सामना पाकिस्तानच्या हातून निसटला. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. अखेर हार्दिकनेच मॅच संपवली.