मुंबई: भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) धुळ चारुन आशिया कप (Asia cup) स्पर्धेत आपलं अभियान सुरु केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला 5 विकेटने हरवलं. या पराभवानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमने (Babar Azam) आपला संघ कुठे कमी पडला? ते सांगितलं. बाबर आजमच्या मते, खराब फलंदाजी पाकिस्तानच्या पराभवाचं एक कारण आहे. म्हणजे एकप्रकारे भारताने पाकिस्तानच्या शक्तीस्थळालाच कमकुवत केलं. सध्याच्या पाकिस्तानी संघातील 2 फलंदाजांचा टी 20 मधील टॉप 3 फलंदाजांमध्ये समावेश होतो.
बाबर आजम जगातील नंबर एक टी 20 फलंदाज आहे. मोहम्मद रिजवान तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरीही हे दोन फलंदाज भारताविरोधात चालले नाहीत. ते चांगली भागीदारी करु शकले नाहीत. बाबरने पराभवासाठी हेच कारण असल्याचं सांगितलं. बाबरने 10 धावा केल्या. रिजवानने सर्वाधिक 43 रन्स केल्या. सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बाबर आजम म्हणाला की, “आमचे खेळाडू मोठी भागीदारी करु शकले नाहीत. भागीदारी झाली असती, तर निकाल वेगळा लागला असता” आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या, असं बाबर म्हणाला. कमीत कमी 50 धावांची भागीदारी होणं आवश्यक होतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 148 धावांच लक्ष्य दिलं होतं. भारताने पाच विकेट गमावून आणि 2 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं.
फलंदाजांच्या कामगिरीवर बाबर आजम निराश आहे. पण गोलंदाजांच्या कामगिरीवर तो समाधानी आहे. आम्हाला सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचायचा होता. नवाजने शेवटची ओव्हर चांगली टाकली. पण निकाल आमच्याबाजूने लागला नाही. डेब्यु करणाऱ्या नसीम शाहच कौतुक केलं. त्याने शाहीन शाह आफ्रिदीची कमतरता जाणवू दिली नाही, अशा शब्दात बाबरने त्याचं कौतुक केलं. नसीमने नव्या चेंडूने कमालीची गोलंदाजी केली. आशिया कप स्पर्धा सुरु होण्याआधी पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रुपात झटका बसला. दुखापतीमुळे तो या स्पर्धेला मुकला. सध्या तो टीम सोबत दुबई मध्ये आहे.