नवी दिल्ली: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC Women’s World Cup) सुरु झाली आहे. या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना उद्या खेळला जाईल. सुपर संडेमध्ये भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने असतील. दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत उत्कंठावर्धक होण्याची अपेक्षा आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा पैसा वसूल सामना असेल. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)सामना युद्धापेक्षा कमी नसतो. या सामन्याच्या माध्यमातून भारत-पाकिस्तानच्या आयसीसी महिला वर्ल्डकपमधील अभियानाला सुरुवात होणार आहे. विजय मिळवण्याचाच दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ यासाठी जोरदार प्रयत्न करतील, यात कुठलीही शंका नाही. पराभव दोन्ही बाजूंना मान्य नसतो. पराभूत होण्याचा अर्थ दोन्ही संघातील खेळाडूंना चांगला ठावूक आहे.
हरमनप्रीतच्या फॉर्ममुळे भारत मजबूत स्थितीत
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी सर्व खेळाडू फिट आहेत, ही भारतीय महिला संघासाठी चांगली बाब आहे. हरमनप्रीत कौरचं फॉर्ममध्ये येणं, हे भारतासाठी फायद्याचं आहे. ती चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकते. याच क्रमांकावर फलंदाजीला येणं, तिला आवडतं. याच क्रमांकावर खेळताना तिने वॉर्मअप मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. पाकिस्तान विरुद्ध तोच फॉर्म कायम ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा असेल.
सामन्याआधी झाली कर्णधारांची भेट
मिताली राजच्या संघाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या महिला संघानेही पूर्ण तयारी केली आहे. विजयासाठी ते कुठलीही कसर ठेवणार नाहीत. सामन्याच्या एकदिवस आधी भारत आणि पाकिस्तानचे कर्णधार परस्परांना भेटले व फोटोही काढले.