मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धा शनिवारपासून सुरु होत आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये 28 ऑगस्टला रविवारी सामना होणार आहे. या मॅचसाठी दोन्ही संघ नेट मध्ये कसून सराव करतायत. सामन्याआधी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. दोन्ही बाजूच्या माजी क्रिकेटपटूंकडून विविध वक्तव्य केली जात आहेत. काहींना भारताची बाजू सरस वाटतेय. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस (Scott Styris) यांनी, तर भारतीय संघात सर्व प्रतिस्पर्धी संघांना चिरडण्याची क्षमता आहे, असं विधान केलय. दरम्यान पाकिस्तानचे हेड कोच सकलेन मुश्ताक यांनी, भारताला आपल्या गोलंदाजी युनिटचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
“भले आमचा स्ट्राइक बॉलर शाहीन शाह आफ्रिदी आशिया कप मध्ये खेळणार नसेल, पण आमचे दुसरे गोलंदाजही तितकेच धोकादायक आहेत” असं सकलेन मुश्ताक प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले. “कॅप्टन आणि संपूर्ण कोचिंग स्टाफला आपल्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी युनिटच नेतृत्व करायचा. पण अन्य गोलंदाजही आपल्या बळावर बाजी उलटवू शकतात. भारतीय फलंदाजांना अडचणीत आणतील” असं सकलेन मुश्ताक म्हणाले.
शाहीन आफ्रिदी गुडघे दुखापतीमुळे पाकिस्तानी संघात नाहीय. शाहीनच्या अनुपस्थितीत, पाकिस्तानचा गोलंदाजी विभाग कमकुवत दिसून येतोय. शाहीन आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला पाकिस्तानी संघात स्थान देण्यात आलं आहे. टी 20 मध्ये त्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. द हंड्रेड लीग मध्येही त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 धावांपेक्षा जास्त आहे.
पाकिस्तानकडे हॅरिस रौफ, नसीम शाह आणि शहनवाज दहानी सारखे तीन वेगवान गोलंदाज आहेत. तिघांकडे वेग आहे, पण अनुभवाची कमतरता आहे. ज्याचा फायदा टीम इंडियाच्या फलंदाजांना होऊ शकतो. पाकिस्तानकडे शादाब खान आणि उस्मान कादिर सारखे दोन लेग स्पिनर आहेत. शादाब खान बॅटिंग सुद्धा करतो. उस्मान कादिर चांगला लेग स्पिनर आहे. त्याशिवाय मोहम्मद नवाजच्या रुपातही पाकिस्तानकडे एक चांगला स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर आहे.