मुंबई: पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेटने हरवून भारताने आशिया कप (Asia cup) स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे होतं. सामना देखील तसाच अटीतटीचा झाला. 2 चेंडू राखून भारताने 148 धावांचे लक्ष्य पार केलं. या विजयामुळे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ग्रुप ए मध्ये टॉप वर आला आहे. आशिया कप 2022 स्पर्धेत भारत-पाकिस्तान मधील हा शेवटचा सामना नव्हता. दोन्ही संघ आठवड्याभरात पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात. याची शक्यता अधिक आहे. भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याची तयारी करतोय.
भारतासोबत ग्रुप ए मध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगचा संघ आहे. ग्रुप ए आणि बी मधील दोन टॉप टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करतील. हे सामने 3 सप्टेंबरपासून सुरु होतील. 4 सप्टेंबरला म्हणजे रविवारी ग्रुप ए मधील टॉप 2 टीम्स पुन्हा एकदा आमने-सामने येतील. भारत आणि पाकिस्तानला पुढचा सामना हाँगकाँग विरुद्ध खेळायचा आहे. दोन्ही टीम्सनी हाँगकाँगला हरवलं, तर अशा स्थितीत भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येतील. हाँगकाँगचा संघ दोन पैकी एकही सामना जिंकला, तर टॉप 2 टीम्ससाठी अडचण निर्माण होईल. नेट रनरेट पर्यंत विषय जाईल. भारत मजबूत स्थितीमध्ये आहे. भारताचा रनरेट सध्या 0.175 आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -0.175 आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्ध विजयी सुरुवात करतानाच मागच्या पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने दुबईच्याच स्टेडियम मध्ये भारतीय संघाचा 10 विकेटने पराभव केला होता. त्या पराभवाचा हिशोब टीम इंडियाने चुकता केला आहे.