मुंबई: आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ दोनवेळा भिडले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. सुपर 4 राऊंड मध्ये पाकिस्तानने भारताला नमवलं. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने खूपच रोचक खुलासा केला आहे. दुबई मध्ये रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यावेळी आफ्रिदीची छोटी मुलगी तिरंगा झेंडा फडकवत होती. शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी न्यूज चॅनलवर हा खुलासा केला. पाकिस्तानने भारताला या सामन्यात पाच विकेटने हरवलं.
शाहीद आफ्रिदी पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीवर बोलत होता. दुबईत स्टेडियम मध्ये भारतीय चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त 10 टक्के पाकिस्तानी उपस्थित होते. सामन्याच्यास्थळी पाकिस्तानचे झेंडे मिळत नव्हते. त्यामुळे माझी मुलगी भारताचा तिरंगा ध्वज फडकवत होती. आफ्रिदीने आनंदात, हसत-हसत हा किस्सा सांगितला. माझी मुलगी तिरंगा ध्वज फडकवत असल्याचा व्हिडिओ मला मिळाला. पण तो टि्वट करायचा की, नाही या व्दिधा मानसिकतेत होतो, असं त्याने सांगितलं.
दुबई मध्ये रविवारी पाकिस्तानी संघाने भारतापेक्षा सरस खेळ दाखवला. भारताचा या मॅच मध्ये पराभव झाला. सामना खूपच रोमांचक झाला. फक्त एक चेंडू बाकी राखून पाकिस्तानने विजय मिळवला. भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 मध्ये आणखी एक सामना होऊ शकतो. भारतीय संघाने सुपर 4 चे दोन सामने जिंकले, तर ते फायनल मध्ये पोहोचतील. पाकिस्तानने सुद्धा अशीच कामगिरी केली, तर दोन्ही संघ फायनलमध्ये पुन्हा भिडतील.
सुपर 4 राऊंड मध्ये भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध जिंकावं लागेल. श्रीलंकेची फलंदाजी मजबूत आहे. त्यांचे बॅट्समन स्पिनर्स विरोधात चांगली फलंदाजी करतात. आता टीम इंडिया श्रीलंकेविरोधात कुठल्या कॉम्बिनेशनसह उतरणार, त्याची उत्सुक्ता आहे. त्यानंतर भारताला अफगाणिस्तान विरुद्ध खेळायचं आहे. हा सामना सुद्धा सोपा नसेल. कारण अफगाणिस्तान संघाकडेही चांगले खेळाडू आहेत. पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आता कसा कमबॅक करतो, ते लवकरच कळेल.