मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये 28 ऑगस्टला सामना होणार आहे. आशिया कप (Asia cup) मध्ये दोन्ही संघांमधील हा पहिला सामना आहे. विजयी शुभारंभ करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया जोरदार तयारी करतेय. खासकरुन भारतीय फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. गुरुवारी रात्री टीम इंडियीने नेट्स मध्ये जोरदार सराव केला. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) बॅटिंगलाही चांगलीच धार आली होती. हा डावखुरा फलंदाज नेट्स मध्ये काही चांगले शॉट्स खेळला. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर त्याने षटकारही ठोकला. त्यानंतर दीपक चाहरने कोच व्हीव्हीएस लक्ष्मण आणि ऋषभ पंत बरोबर वाद घातला.
ज्येष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्या व्हिडिओनुसार, टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतला कार्यवाहक हेड कोच लक्ष्मण यांनी मोठे फटके खेळण्याचं चॅलेंज दिलं. समोर दीपक चाहर गोलंदाजी करत होता. दीपक चाहरने फुलटॉस चेंडू टाकला. त्यावर पंतने हॅलिकॉप्टर शॉट खेळत षटकार ठोकला. व्हीव्हीएस लक्ष्मण अंपायरिंग करत होते. त्यांनी षटकार मारल्याची खूण केली. त्यानंतर दीपक चाहर हेड कोच बरोबर काहीतरी बोलताना दिसला. त्याला कदाचित लक्ष्मण यांचा निर्णय पटला नाही. पंत बरोबर सुद्धा तो काहीतरी बोलला.
टीम इंडियाची सध्या दुबई मध्ये प्रॅक्टिस सुरु आहे. टीम मधील खेळाडूंना मोठे फटके खेळण्याचं खुलं लायसन्स मिळालं आहे. सर्वच भारतीय फलंदाज आक्रमक फलंदाजीची प्रॅक्टिस करताना दिसले. सर्वात आधी विराट कोहलीचा व्हिडिओ चर्चेत आला. त्याने अनेक हवाई फटके खेळले. कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा असेच शॉट्स खेळला. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवनेही आक्रमक फलंदाजी केली. तो 360 डिग्री मध्ये शॉट्स खेळताना दिसला. भारताकडे उत्तम फलंदाज आहेत, तर पाकिस्तानची गोलंदाजी देखील तितकीच मजबूत आहे. 28 ऑगस्टला एक रोमांचक सामना पहायला मिळेल.