मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाबाबत (ICC T20 World Cup 2021) एक मोठी माहिती समोर आली आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान जवळपास अडीज वर्षानंतर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याचविषयी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विचारलं असता, त्यांच्याविरुद्ध खेळणं नेहमीच रोमांचक असतं, दबाव असतो, अंगात एक वेगळी उर्जा संचारते, पण आणखी या सामन्यांना वेळ आहे, अशी पहिली प्रतिक्रिया भुवनेश्वर कुमारने दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्याची जशी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते तशी ती खेळाडूंना देखील असते. काल टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधले ग्रुप क्लिअर झालेत. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाच गटात आहे. त्यामुळे टी ट्वेन्टी स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार, हे मात्र नक्की… जवळपास अडीज वर्षानंतर हे दोन्ही संघ एकमेकांना ललकारताना दिसतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक होत असतो. परंतु भारतीय संघ सध्या टी -20 वर्ल्डकपबद्दल विचार करत नाही कारण आयसीसी टी ट्वेन्टी स्पर्धेपूर्वी बरेच क्रिकेट खेळायचं आहे.
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत असलेल्या भुवनेश्वर कुमारने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटलं, “पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच रोमांचक असते आणि या सामन्यात नेहमीच दबाव असतो म्हणून नक्कीच ते खूपच रोमांचक आहे. सामन्यात जोरदार टक्कर होईल….”
पण खरं सांगायचं तर आम्ही टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधल्या भारत पाक सामन्याविषयी विचार केला नाही, कारण त्या अगोदर बरंच क्रिकेट खेळायचं आहे. आम्हाला श्रीलंकेत सामने खेळायचे आहेत, इंग्लंडमध्ये कसोटी सामने आहेत, त्यानंतर आयपीएल आणि नंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप आहे…. आयपीएल संपल्यावर वर्ल्ड कपबद्दल संघ विचार करेल”
सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ग्रुप-1 मध्ये आहेत. या संघामध्ये सामने कधी आणि कसे होणार याबाबत पुढील आठवड्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(India vs Pakistan T20 World Cup Bhuvneshwar Kumar)
हे ही वाचा :
‘प्यार का कोई धर्म नही होता…’ भारतीय खेळाडू शिवम दुबे मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध
IND vs ENG : ऋषभ पंतला कोरोना, संघाला नव्या यष्टीरक्षकाची गरज, ‘या’ खेळाडूचं सूचक ट्वीट