मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानसमोर अडचण निर्माण झाली आहे. आशिया कप मध्ये भारताला पराभूत करण्याच्या त्यांच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. पाकिस्तानला (Pakistan) आता शाहीन शाह आफ्रिदीचा पर्याय शोधावा लागेल. पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीची जागा भरुन काढणारा गोलंदाज हवा आहे. ज्याच्याकडे वेग, टप्पा आणि अनुभव असेल. त्यात तो डावखुरा गोलंदाज निघाला, तर फायदाच आहे. फक्त शाहीन शाह आफ्रिदीची जागा घेणारा तो गोलंदाज कोण असेल?. शाहीन शाह आफ्रिदी आशिया कप मधून बाहेर गेल्यानंतर आता मोहम्मद आमिर ट्रेंड होत होता. वहाब रियाजच नावही समोर आलं. पण नंतर तो दुखापतग्रस्त असल्याचं कळलं. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शाहीन शाह आफ्रिदीसारखी क्षमता आहे. ते सुद्धा डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. मोहम्मद आमिर रिटायर झाला आहे. वहाब रियाज दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तान या दोघांची निवड करु शकत नाही.
पाकिस्तानकडे अजून एक अनुभवी गोलंदाज आहे, हसन अली. पाकिस्तानने हसन अलीला आशिया कपसाठीच नाही, तर नेदरलँड विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी सुद्धा निवडलेलं नाही. तो आऊट ऑफ फॉर्म आहे. आता ज्याला पाकिस्तानने आधीच निवडलेलं नाही. त्याला पाकिस्तान आता कसा निवडणार? हा प्रश्न आहे. भारताविरुद्ध हसन अली 5 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळलाय.
शाहीन आफ्रिदीचा पर्याय म्हणून एक धक्का देणारं नाव समोर येतय. मीर हामजा हा 29 वर्षांचा गोलंदाज आहे. सध्या तो काश्मीर प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. मीर हामजाकडे आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या नावावर फक्त एक कसोटी सामना आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2018 साली तो हा कसोटी सामना खेळला होता. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार मीर हामजाच्या नावाची चर्चा करतायत. आशिया कपसाठी मीर हामजा सरप्राइज पॅकेज ठरेल, असं म्हटलं जातय.
शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी पाकिस्तानकडे मोहम्मद हसनैनचाही एक पर्याय आहे. 22 वर्षांचा हा युवा पाकिस्तानी गोलंदाज सध्या ‘द हण्ड्रेड’ स्पर्धेत खेळतोय. ओव्हल इन्विंसिबलचा तो दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. हसनैन पाकिस्तानसाठी 18 टी 20 आणि 8 वनडे सामने खेळलाय. भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे नाहीय.