नवी दिल्ली: वाईट काळात वारंवार संधी मिळाली. संपूर्ण टीमने साथ दिली. पण अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बॅटने काही कमाल करुन दाखवता आली नाही. 2021 पासून अजिंक्य रहाणेचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. 10-12 डावात फ्लॉप झाल्यानंतर अजिंक्यने एखाद-दुसरी चांगली खेळी केलीय. जोहान्सबर्ग कसोटीत (Johansburg test) दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी त्याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली. मागच्या दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली होती. पण तरीही अनुभवाला प्राधान्य देत हेड कोच राहुल द्रविड, विराट कोहली यांनी अजिंक्यला पाठिंबा दिला व तिसऱ्या कसोटीत संधी दिली. (india vs south africa 3rd test capetown After ajinkya rahane out gautam-gambhir comment)
अजून किती संधी द्यायची
पण त्याने पुन्हा एकदा निराश केले आहे. मयंक, राहुल आणि पुजारा पॅव्हेलियनमध्ये परतलेले असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रहाणे स्वस्तात बाद झाला आणि संघाला आणखी अडचणीत आणलं. त्यामुळे त्याच्यावर संघ व्यवस्थापन इतकं मेहरबान का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरंतर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर दोघे चांगली कामगिरी करुनही बेंचवर बसले आहेत. केपटाऊन कसोटीत अजिंक्य रहाणे अवघ्या (9) धावांवर बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहाणेने बाद झाल्यानंतर रिव्ह्यू सुद्धा घेतला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
रहाणेवर गौतम गंभीरने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानतंर गौतम गंभीरने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रहाणे मागच्या वर्षभरापासून एकसारखीच चूक करतोय. खूप बचावात्मक खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. “रहाणेच्या पायामध्ये मागच्या एकवर्षापासून काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचा पायच बाहेर येत नाही, ज्यामुळे त्याला बॅलेंस ठेवता येत नाही. दक्षिण आफ्रिकेत चेंडू खूप सीम होतो, त्यामुळे केवळ हाताच्या बळावर फलंदाजी नाही करु शकतं” असे गंभीर स्टार स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीमध्ये म्हणाला.
“रहाणेचं फुटवर्क खराब असल्यामुळे त्याला बाहेर जाणाऱ्या आणि आतमध्ये येणारे चेंडू खेळताना अडचण येते. फिरकी गोलंदाजी खेळतानाही तो सहज नसतो” असं गंभीर म्हणाला. तिसऱ्या केपटाऊन कसोटीत अजिंक्य रहाणेला संघात स्थान देऊ नका. त्याऐवजी हनुमा विहारीला संधी द्या, असं गौतम गंभीरचं स्पष्ट मत होतं.
(india vs south africa 3rd test capetown After ajinkya rahane out gautam-gambhir comment)