मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज 2-2 अशी ड्रॉ झाली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. बेंगळुरुमध्ये रविवारी पाऊस कोसळला. त्यामुळे फक्त 3.3 षटकांचा खेळ होऊ शकला. या पावसाने BCCI ची सुद्धा पोलखोल केली आहे. सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल केलं जातय. हजारोकोटींची कमाई करणाऱ्या बीसीसीआयच्या बेजबाबदारपणावर क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया राइट्स विक्रीतून (IPL Media Rights) 48 हजार कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी सुद्धा बीसीसीआयने आय़पीएल आणि प्रसारण हक्कातून भरपूर पैसा कमावलाय. पण अजूनही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सुविधा मिळत नाहीत. तुटलेल्या खुर्च्या, छप्पर हे प्रश्न आजही कायम आहेत.
काल बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाचवा टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला. काल पाऊस सुरु झाला नव्हता, तो पर्यंत सर्व ठिक होतं. पण पाऊस सुरु होताच प्रेक्षकांची एकच पळापळ झाली. अनेक क्रिकेट रसिकांना आपलं आसन सोडावं लागलं. याचं कारण होतं, स्टेडियमचं गळकं छप्पर. अलीकडेच बीसीसीआयने 48 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेला आयपीएलचे मीडिया राइट्स विकले. स्टेडियममध्ये सुविधा उभारणी आणि सुधारणेसाठी या रक्कमेचा वापर केला जाईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. बंगळुरुच्या याच स्टेडियमवर आयपीएलचे सामने सुद्धा होतात. पण एकाच पावसाने स्टेडियममधील खराब सुविधांची पोल-खोल केली आहे.
These are the kind of facilities we fans have at the stadium! ??♂️High time @BCCI used all the money pouring in to provide better facilities to the fans who take pains of coming to stadia to watch matches! #BCCI #Banglore #chinnaswamystadium #INDvsRSA #RuturajGaikwad pic.twitter.com/6N2TWmfFfU
— amayprem 25 (@Amayprem333) June 19, 2022
एका युजरने बोर्डाची खिल्ली उडवताना बाहेर नैसर्गिक पाऊस आणि आतमध्ये पेड पाऊस सुरु असल्याचं म्हटलं होतं. या स्टेडियमवर सामने पाहण्यासाठी तिकीटाचे दर 5 ते 25 हजार रुपयापर्यंत आहेत, असं एका दुसऱ्या युजरने म्हटलं होतं. बोर्डाने प्रेक्षकांकडून पावसाचे पैसे वसूल केले आहेत, असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. काल सीरीजमधला शेवटचा सामना होता. मालिकेचा निकाल ठरवणारा सामना असल्यामुळे सगळ्यांनाच या मॅचची आतुरता होती. पण पावसाने पाणी फिरवलं.