केपटाऊन: क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात. केपटाऊनच्या मैदानात (Capetown test) भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत आज याचा प्रत्यय आला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar pujara) तंबूत पाठवलं. पुजारा खेळपट्टीवर चिकटला की, त्याची विकेट मिळवणं कठीण असतं. त्यामुळेच कसोटीमध्ये उपयुक्त फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 43 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टयांचं स्वरुप बघता या धावा उपयुक्त ठरल्या.
विकेटवर खरा हक्क कीगन पीटरसनचा
दुसऱ्याडावात पुजारा स्वस्तात नऊ धावांवर बाद झाला. खरंतर जॅनसेनच्या खात्यात पुजाराची ही विकेट जमा होणार असली, तरी त्यावर खरा हक्क कीगन पीटरसनचा आहे. कारण त्याने एक जबरदस्त झेल घेऊन हा विकेट बनवला.
तिसऱ्यादिवसातील पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॅनसेनने पूजाराला बाद केले. यामध्ये मोठे योगदान दिले ते कीगन पीटरसनने. जॅनसेनच्या गोलंदाजीवर पीटरसन लेग स्लीपमध्ये उभा होता. त्यानेच पुजाराच अविश्वसनीय झेल पकडला. ज्याने कोणी हा झेल बघितला, ते हैराण झाले. पुजारालाही आपण अशा पद्धतीने आऊट होऊ शकतो, यावर विश्वास बसला नाही.
Keegan Petersen with a magnificent catch on the second ball of the day? #SAvIND #FreedomTestSeries #BePartOfIt | @Betway_India pic.twitter.com/zqcAtMahSi
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 13, 2022
नेमका कसा झेल घेतला?
चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने तिसऱ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी दोघांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, आजही तशीच ते फलंदाजी कायम ठेवतील अशी अपेक्षा होती. पण दिवसातील दुसऱ्याच चेंडूवर भारताला झटका बसला. मार्को जॅनसेनने शॉर्ट पीच बॉल टाकला. चेंडूला उसळी मिळाली आणि चेंडू पुजाराच्या हाताला लागून लेग स्लीपला गेला. तिथे उभा असलेला कीगन पीटरसन चित्याच्या चपळाईने चेंडूवर हवेत झेपावला व एक अविश्वसनीय झेल घेतला. खरोखरच कसोटी क्रिकेटमधला हा एक सुंदर क्षण होता. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण पीटरसनचं कौतुक करेल. कारण त्याने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना दाखवला.