केपटाऊन: जोहान्सबर्ग पाठोपाठ केपटाऊनमध्येही (Capetown) भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जे शक्य झालं, तसं भारताला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकदाही मालिका विजयाचं स्वप्न साकार करता आलेलं नाही. पहिली सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यामुळे मालिका विजयाची आशा निर्माण झाली होती. भारतीय संघाने या संपूर्ण मालिकेत चांगली लढत दिली. पण काही त्रुटी राहिल्या, ज्यामुळे विजयाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. जाणून घेऊया भारताच्या पराभवाची चार कारणं
सलामीवीरांच अपयश –
जोहान्सबर्ग प्रमाणे केपटाऊन कसोटीतही भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल अपयशी ठरले. पहिल्या डावात राहुलने (12) आणि मयंकने (15) धावा केल्या. दुसऱ्याडावातही तोच कित्ता गिरवला. राहुल (10) आणि मयंक (7) धावांवर बाद झाला. सेंच्युरियनमध्ये दोघांनी शतकी सलामी दिली होती. त्यामुळे भारताचा पुढचा मार्ग सोपा झाला होता. पहिल्या डावातील आघाडीचा दुसऱ्या डावात भारताला फायदा झाला होता.
मधल्या फळीचं अपयश
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली तिघेही मधल्या फळीत खेळतात. पुजारा-अजिंक्यने दुसऱ्याकसोटीच्या दुसऱ्याडावात अर्धशतक झळकावलं, तर विराटने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. तीन पैकी एकाही कसोटी सामन्यात तिघे एकत्र चालले नाहीत. मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली.
दुसऱ्याडावात निष्प्रभ गोलंदाजी
या संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेवर वचक ठेवला. पण मोक्याच्या क्षणी त्यांना कामगिरी उंचावता आली नाही. जोहान्सबर्ग प्रमाणे केपटाऊनमध्येही भारतीय गोलंदाज दुसऱ्याडावात निष्प्रभ ठरले. या दोन्ही कसोटीच्या पहिल्या डावात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. पण दुसऱ्याडावात त्यांना तशी कामगिरी करता आली नाही.
तरुण रक्ताला संधी दिली पाहिजे होती
निवड समितीने श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड केली होती. पण अय्यरला एकही संधी मिळाली नाही तेच विहारीला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. पण विराट संघात परतल्यानंतर त्याला वगळण्यात आलं. खरंतर मालिका सुरु होण्याच्याआधीपासूनच अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तरीही टीम मॅनेजमेंटने तिन्ही कसोटीत त्याला खेळण्याची संधी दिली. तेच श्रेयस अय्यरला एकतरी चान्स मिळायला पाहिजे होता. कारण अय्यरने 56 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 52.10 च्या सरासरीने 4794 धावा केल्यात. यात 13 शतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 80 चा आहे. म्हणजेच तो वेगाने धावा बनवू शकतो.