जोहान्सबर्ग: सेंच्युरियन कसोटीच्या (Centurion Test) पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी करणारा भारताचा संघ तिसऱ्यादिवशी ढेपाळला. भारतीय फलंदाजांनी आपल्या खेळाने विश्वास निर्माण केला होता. पण तीच लय त्यांना आज कायम राखता आली नाही. दुसऱ्यादिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. आज भारताने शेवटच्या सात विकेट 49 धावांमध्ये गमावल्या. भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला.
आजची टीम इंडियाची फलंदाजी पाहून क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला असेल, की पहिल्यादिवशी इतक्या सहजतेने आफ्रिकन गोलंदाजी खेळणारे फलंदाज तिसऱ्यादिवशी कसे काय फेल झाले?. सेंच्युरियनच्या मैदानावर भारताची संपूर्ण मधली फळी कोसळली. केएल राहुल, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अश्विन, शार्दुल ठाकूर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेची 6.5 इंचाची रणनिती
आज दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी आपल्या रणनितीमध्ये मोठा बदल केला. त्यामुळे ते भारतीय फलंदाजांवर वरचढ ठरले. पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना आफ्रिकन गोलंदाजांचा वेग आणि चेंडूला चांगली उसळी मिळत होती. फक्त स्टंम्पपासून लांब चेंडू टाकत होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सहजतेने ते चेंडू सोडता येत होते. पण आज तेच गोलंदाज 6.5 इंच आतल्याबाजूला बॉलिंग करत होते. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी आज भारतीय फलंदाजांना प्रत्येक चेंडू खेळायला भाग पाडले. परिणामी त्यांना मोठं यश मिळालं.
लुंगी निगीडी आणि कगिसो रबाडाचा भेदक मारा
लुंगी निगीडी आणि कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांनी भारताची योजना धुळीस मिळवली. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. निगीडीने सहा तर राबाडाने तीन विकेट घेतल्या. भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला. रविवारच्या धावसंख्येत भारताला फक्त 54 धावांची भर घालता आली.