पर्थ: टी 20 वर्ल्ड कपचा तिसरा सामना खेळणाऱ्या टीम इंडियाची खराब स्थिती आहे. टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याच्यासह टीमच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. अपवाद फक्त सूर्यकुमार यादवचा. नेहमीप्रमाणे आजही एकटा सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना नडला.
लुंगी निगीडी टीम इंडियासाठी घातक गोलंदाज
त्याने 40 चेंडूत 68 धावा केल्या. सूर्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीसमोर हार मानली नाही. याउलट कॅप्टन रोहित शर्मा आणि केएल राहुलला टीमला अपेक्षित सुरुवात करुन देता आली नाही. टीमच्या 23 धावा असताना रोहित शर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. दक्षिण आफ्रिकेचा लुंगी निगीडी टीम इंडियासाठी घातक गोलंदाज ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 विकेट काढल्या.
केएल राहुल पुन्हा फ्लॉप
रोहितने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निगीडीकडे सोपा झेल दिला. त्याने 14 चेंडूत 15 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता. केएल राहुल पुन्हा अपयशी ठरला. निगीडीने त्याने विकेटकीपरकरवी झेलबाद केलं. 14 चेंडूत 9 धावा करताना एक षटकार लगावला. पावरप्लेमध्ये टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही.
दीपक हुड्डाने संधी मिळून काय केलं?
विराट कोहलीने दोन चौकार लगावून आशा निर्माण केली होती. पण तो सुद्धा निगीडीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने 11 रन्स केल्या. हार्दिक पंड्या 2 आणि संधी मिळालेला दीपक हुड्डा भोपळाही फोडू शकला नाही.
दिनेश कार्तिककडून निराशा
दुसऱ्याबाजूने दिनेश कार्तिक उभा राहिला. त्याने सूर्युकमारला फक्त साथ दिली. दिनेश कार्तिकने खूप सुमार बॅटिंग केली. 15 चेंडूत 6 धावा करुन पार्नेलच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 133 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांच सोपं लक्ष्य दिलं आहे.