पर्थ: टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा आज पराभव झाला. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. याआधी टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड विरुद्धचा सामना जिंकला होता. पण आज त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणं टीम इंडियाला जमलं नाही. टीम इंडियाचा आज पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना झाला.
फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच वर्चस्व
या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला 134 धावांच लक्ष्य दिलं होतं. त्यांनी लास्ट ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच वर्चस्व पहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेने शेवटचे 2 चेंडू राखून विजय मिळवला. टीम इंडियाने कमी धावसंख्या केली होती. पण शेवटपर्यंत मॅच सोडली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीपने 2, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतला.
सहजासहजी विजय मिळू दिला नाही
टीम इंडियाने टी 20 क्रिकेटचा विचार करता दक्षिण आफ्रिकेला सोपं लक्ष्य दिलं होतं. पण त्यांना सहजासहजी विजय मिळू दिला नाही. टीम इंडियाने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के देऊन बॅकफूटवर ढकललं होतं. अर्शदीप सिंहने दुसऱ्या ओव्हरमध्ये क्विटंन डि कॉक (1) आणि फॉर्ममध्ये असलेल्या राइली रुसौला (०) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
Well Done South Africa. India fought well till the end but 133 wasn’t enough
Similar to the 50 over 2011 World Cup , India lose to South Africain group stage. Hopefully will win all from here. #INDvsSA— Virender Sehwag (@virendersehwag) October 30, 2022
मार्करामची हाफ सेंच्युरी
त्यानंतर मोहम्मद शमीने टेंबा बावुमाला (10) विकेटकीपर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं. 24 धावात त्यांचे टॉप 3 प्लेयर तंबूत परतले होते. पण एडन मार्कराम आणि डेविड मिलरने चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. मार्करामने हाफसेंच्युरी झळकावली. त्याने 41 चेंडूत 52 धावा करताना 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. हार्दिक पंड्याने त्याचा अडसर दूर केला. डेविड मिलरने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 46 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तीन षटकार होते.
शॉर्ट पीच चेंडूने घात केला
टीम इंडियाचा आज शॉर्ट पीच चेंडूंनी घात केला. कॅप्टन रोहित शर्मा, (15) विराट कोहली (12) आणि हार्दिक पंड्या (2) हे प्रमुख फलंदाज लुंगी निगीडीने टाकलेल्या शॉर्ट पीच चेंडूच्या जाळ्यात अडकले. पुल खेळण्याचा मोह टीम इंडियाला नडला. टीम इंडियाने आणखी 30-35 धावा केल्या असत्या, तर निकाल कदाचित दुसरा असता.