India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 2: पावसाच्या बॅटिंगमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

| Updated on: Dec 28, 2021 | 8:41 AM

निगीडी वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी दाद दिली नाही. आज मोठी धावसंख्या उभारुन दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 2: पावसाच्या बॅटिंगमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
File photo
Follow us on

सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IndvsSA) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर अखेर पावासने पाणी फिरवले आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क (Centurion super sport park) स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सकाळी खेळाला सुरुवात होण्याआधी सेंच्युरियनमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे सामना विलंबाने सुरु होईल असे वाटले. पाऊस थांबल्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सामना सुरु करण्याआधी मैदानाचे निरीक्षण करायचेही ठरवले. पण अधन-मधन पावसाचा खेळ सुरुच होता. अखेर पाऊस थांबणार नसल्याची चिन्हे दिसल्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. आज दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरु शकले नाहीत. त्यामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाला. आता कसोटीचे फक्त तीन दिवस उरले आहेत.

काल पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावल असून तो (122) धावांवरुन उद्या डाव पुढे सुरु करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) साथ देईल. रहाणे (40) धावांवर नाबाद आहे.

मयांक अग्रवाल आणि राहुलने काल पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. त्यांच्या दमदार सलामीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आलं. मयांकला (६०) धावांवर निगीडीने पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो (35) धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता आल्यापावली माघारी परतला.

हे तिन्ही विकेट निगीडीने घेतले. निगीडी वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी दाद दिली नाही. आज मोठी धावसंख्या उभारुन दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलण्याचे भारताचे लक्ष्य होते. भारतासाठी दौऱ्याची सुरुवात समाधानकारक झाली आहे. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भारत मैदानात उतरला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Dec 2021 05:34 PM (IST)

    पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द

    पावसामुळे अखेर भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीतील दुसऱ्यादिवसाचा खेळ रद्द झाला आहे. आता उद्या सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

  • 27 Dec 2021 04:40 PM (IST)

    खेळपट्टीवर पुन्हा कव्हर

    सेंच्युरियनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. खेळपट्टीवर पुन्हा कव्हर. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता.


  • 27 Dec 2021 03:51 PM (IST)

    पाऊस थांबला, पंच थोड्याचवेळात करणार मैदानाची पाहणी

    Centurain Weather update: सेंच्युरियनमध्ये आता पाऊस थांबला आहे. ग्राऊंड स्टाफ मैदान सूकवून खेळण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पंच 4.15 वाजता मैदानाची पाहणी करुन निर्णय घेतील.

  • 27 Dec 2021 03:26 PM (IST)

    पावसामुळे पहिले सत्र गेले वाया

    पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला आहे. स्थितीमध्ये काही सुधारणा दिसत नाहीय. तीन वाजता मैदानाचे निरीक्षण होणार होते. पण त्यावेळी पुन्हा पाऊस सुरु झाला. त्यामुळे नियोजित वेळेआधीच लंच ब्रेक घेण्यात आला.

  • 27 Dec 2021 02:48 PM (IST)

    पाऊस थांबला, तीन वाजता मैदानाचे होणार निरीक्षण

    सेंच्युरियनमध्ये पाऊस थांबला असून ग्राऊंड स्टाफ मैदान सुकवण्याचे काम करत आहे. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा पाऊस सुरु झाला नाही, तर भारतीय वेळेनुसार पंच तीन वाजता मैदानाचे निरीक्षण करुन निर्णय घेतील.

  • 27 Dec 2021 02:17 PM (IST)

    पुन्हा पावसाला सुरुवात

    सेंच्युरियनवर पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्यामुळे मैदान सुकवण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला आहे. त्यामुळे सामना सुरु व्हायला आणखी वेळ लागू शकतो.

  • 27 Dec 2021 01:44 PM (IST)

    पावसाचा व्यत्यय

    पावसामुळे नियोजित वेळेत सामना सुरु होऊ शकलेला नाही. सध्या पाऊस थांबला असून मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे थोडा उशिराने सामना सुरु होईल.