केपटाऊन: केपटाऊन (Capetown test) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या एकबाद 17 धावा झाल्या आहेत. मार्कराम (8) आणि केशव महाराजची (6) जोडी मैदानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ (south Africa team) अजूनही 206 धावांनी पिछाडीवर आहे. कॅप्टन डीन एल्गरच्या रुपाने पहिला झटका बसला आहे. एल्गर तीन धावांवर बाद झाला. बुमराहने त्याला पुजाराकरवी झेलबाद केले. भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आला.
सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंच्युरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. केपटाऊनमध्ये जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मागच्या सात दक्षिण आफ्रिका दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. केपटाऊन कसोटी जिंकून 29 वर्षांपासूनचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटीत खेळतोय, ही भारतीय संघासाठी चांगली बाब आहे. पाठिच्या दुखण्यामुळे विराट कोहली दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि इशांत शर्मा.
दक्षिण अफ्रीका: डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा, कगिसो रबाडा, सरेल इरवी, ब्युरेन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी निगीडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वान डर डुसे , काइल वेरेने, मार्को यानसन, ग्लेनटन स्टुरमैन, प्रेनेलन सुब्रायेन, सिसांडा मगाला, रेयान रिकेल्टन, डुआने ओलिवियर.