दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला त्यांच्याविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. या मालिकेसाठी सोमवारपर्यंत टीम इंडियाची घोषणा होणार होती पण आता ती 3-4 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. वनडे कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे आता 31 डिसेंबरपर्यंत संघाची घोषणा केली जाऊ शकते. निवड समितीच्या बैठकीपूर्वी एक मोठी बातमी आहे की, शाहरुख खानलाही दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या वनडे संघात स्थान मिळू शकतं.
शाहरुख खान हा मिडल ऑर्डर बॅट्समन आहे आणि तो भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील टॉप मॅच फिनिशर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. शाहरुखकडे उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता आहे आणि या कौशल्याच्या जोरावर तो कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो.
शाहरुख खाननेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या प्रतिभेचा दाखला दिला. शाहरुख खानने 7 डावात 42 च्या सरासरीने 253 धावा केल्या. विशेष म्हणजे शाहरुखने सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या धावा केल्या. शाहरुख खानचा स्ट्राईक रेट 186 पेक्षा जास्त होता. शाहरुख खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 20 षटकार ठोकले.
वनडे संघात अष्टपैलू व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांची निवडही निश्चित मानली जात आहे. वेंकटेश अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 21 षटकार ठोकले होते आणि त्याची सरासरी 63.16 होती. व्यंकटेशने 379 धावा फटकावल्या.
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 603 धावा केल्या. गायकवाडची फलंदाजीची सरासरी 150.75 होती. गायकवाडने 5 डावात 4 शतके झळकावली.