जोहान्सबर्ग: मागच्या आठवड्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला (India south africa tour) रवाना झाला. त्यावेळी बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली (Virat kohli) या वादाची सर्वत्र चर्चा होती. पण आता हळूहळू सर्व लक्ष पुन्हा एकदा क्रिकेटवर केंद्रीत झाले आहे. 26 डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कारण मागच्या 29 वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या सात दौऱ्यांमध्ये शक्य न झालेली कामगिरी करुन दाखवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
सर्वांच लक्ष विराट कोहली आणि राहुल द्रविड या नवीन कॅप्टन-कोचच्या जोडीकडे असेल. मायदेशात कसोटी मालिकेत न्यूझीलंडला 1-0 ने नमवून या जोडगळीने चांगली सुरुवात केली आहे. पण दक्षिण आफ्रिकेत आव्हान इतकं सोपं नसेल. रवी शास्त्री यांच्याहातात मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा असताना, भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतही भारतीय संघाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
भारतीय संघाने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळप्रमाणेच आता सुद्धा कोहली आणि द्रविड जोडी समोर संघ निवडीचा पेच असेल. कोहली आणि शास्त्री यांच्या संघनिवडीचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 2018 मध्ये उपकर्णधार असूनही अजिंक्य रहाणेला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आता सुद्धा अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबद्दल साशंकता आहे. रहाणेला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे, तेव्हापासून त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातय.
अजिंक्य रहाणेच्या जागी उपकर्णधारपदावर केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. रहाणे मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्हता. सामन्याच्यादिवशी सकाळी रहाणे दुखापतग्रस्त असल्याचे सांगण्यात आले.
अय्यर, विहारी आणि रहाणेमध्ये चुरस
यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात भारताने कसोटी मालिका विजय मिळवला. त्यावेळी अजिंक्य रहाणेने स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केल्यामुळे हे शक्य झाले होते. पण त्याच रहाणेला वर्षअखेरीस संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मागच्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 19.57 च्या सरासरीने रहाणेने 411 धावा केल्या आहेत. हे आकडे समाधानकारक नाहीत. त्यामुळे रहाणेच्या समावेशाबद्दल साशंकता आहे.
दुसऱ्याबाजूला हनुमा विहारीने मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा उचलला आहे. 12 कसोटी सामन्यात 624 धावा केल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या भारतीय ‘अ’ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने तीन अर्धशतकही झळकावली आहेत. त्यामुळे हनुमा विहारीला बसवून ठेवणं परवडणार नाही.
श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्ध कानपूर कसोटीत पदार्पण केले. त्या सामन्याच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं. मुंबई कसोटीत श्रेयस अय्यरने संघातील आपलं स्थान कायम टिकवलं. त्यावेळी राहणे दुखापतीमुळे बाहेर होता. आता कोहली-द्रविड समोर कोणाला बसवायचं आणि कोणाला खेळवायचं हा मोठा प्रश्न असेल.
संबंधित बातम्या:
घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याच्या मुलाचं IPL मध्ये फळफळेल नशीब; 2022च्या लिलावात लागू शकते मोठी बोली
मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल, पाटलांची टोलेबाजी, रश्मी ठाकरेंवर नेमकं काय म्हणाले?
आरोग्य भरतीचे पेपर मंगल कार्यालयात वाटले, विद्यार्थ्यामागं 1 ते दीड लाख, संजय सानपच्या राजकीय कनेक्शनमुळं खळबळ