जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमध्ये भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताला 113 धावांनी हा सामना जिंकता आला. या दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बरेच वाद झाले होते. संघात गटबाजी असल्याची चर्चा होती. पण या सर्व चर्चा, वादांना मागे सोडत टीम इंडियाने दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे. (India vs South Africa Three indian players who play important role in indias win)
भारताच्या या पहिल्या कसोटी विजयाचे मुख्य तीन नायक आहे. केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शामी या तिघांनी पहिल्या डावात केलेली कामगिरी निर्णायक ठरली. केएल राहुलने उपकर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने पहिल्या डावात शानदार 123 शतक झळकावले. मयांकने 60 अर्धशतक झळकावून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या डावात 117 धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.
अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. पण या दोन फलंदाजांनुळे भारताला 300 धावांची वेस ओलांडता आली. 327 धावांवर पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर गोलंदाजांनी भूमिका महत्त्वाची होती. मोहम्मद शामीने गोलंदाजीचा भार समर्थपणे संभाळला. त्याने पहिल्या डावात 16 षटकात 44 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला.
त्याने सलामीवीर मार्कराम, बावुमा हे महत्त्वाचे विकेट घेतले. दुसऱ्या डावातही शामीने भेदक मारा कायम ठेवला. त्याने आणि बुमराहने मिळून प्रत्येकी तीन विकेट घेतले. फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमुळे भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे इथेही भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी कायम आहे.