नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील (India vs South Africa) आगामी वनडे मालिकेला मुकू शकतो. भारत दक्षिण आफ्रिकेत तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी संघात या खेळाडूची निवड झाली होती. भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोरोनाची लागण झाली आहे. (India vs South Africa washington sundar corona virus positive south africa odi series doutful)
त्यामुळे त्याचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीज 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 22 वर्षांचा वॉशिंग्टन सुंदर अन्य खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. पण आता हे कठीण दिसतय. वॉशिंग्टन सुंदर सध्या मुंबईत आहे. इथूनच भारतीय वनडे संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. हे सर्व खेळाडू 12 जानेवारीला सकाळी रवाना होतील.
दहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर
क्रिकबज या क्रिकेट वेबसाइटच्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदर मागच्या दहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. सुंदर मार्च 2021मध्ये शेवटचा इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. दुखापतीमुळेच तो आयपीएलही खेळला नाही. वॉशिंग्टन सुंदरचा अलीकडेच विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तामिळनाडूच्या संघात समावेश करण्यात आला होता. तिथे त्याने दमदार कामगिरी केली. त्यानंतरच निवड समिती सदस्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुंदरची निवड केली. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुंदरचे पुनरागमन लांबू शकते.
असं आहे आंतरराष्ट्रीय करीयर
वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत चार कसोटी, एक वनडे आणि 31 टी-20 चे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये सहाविकेट आणि 265 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये एक विकेट आणि टी-20 मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्याने कसोटी पर्दापण केले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावून त्याने भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. वनडेमध्ये 2017 मध्ये पदार्पण केले पण त्यानंतर तो या फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही.
(India vs South Africa washington sundar corona virus positive south africa odi series doutful)