Ind Vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Srilanka test) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीमध्ये सुरु होत आहे. विराट कोहलीची (Virat kohli) ही 100 वी कसोटी, तर रोहित शर्माचा (Rohit Sharma) कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देणारा विराट 100 वी कसोटी संस्मरणीय करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. रोहित शर्मा भारताचा 35 वा कसोटी कर्णधार म्हणून एक नवीन इनिंग सुरु करेल. सकाळी 9.30 वाजता मोहालीच्या स्टेडियमवर हा सामना सुरु होईल. विराट कोहलीसाठी हा क्षण ऐतिहासिक बनवण्यासाठी बीसीसीआयने खास तयारी केली आहे. स्वत: विराट कोहली सुद्धा या सामन्यात इतिहास रचू शकतो. सर्वांनाच विराट कोहलीच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आहे. भारताने 1932 साली कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारतात तयार झाले.
आजचा क्षण महत्त्वाचा
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अनेक महत्त्वाचे क्षण अनुभवले. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये गाठलेला 10 हजार धावांचा टप्पा तसंच सचिन तेंडुलकरचा वानखेडेवरील शेवटचा कसोटी सामना. क्रिकेट चाहत्यांनी आजही हे क्षण मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवले आहेत. आज विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना त्याच दृष्टीने खास असेल. रोहित शर्मा आणि बीसीसीआयने या क्षणाला खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली आहे.
71 व्या शतकाची प्रतिक्षा
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतकं झळकावली आहेत. यात 43 शतकं वनडेमध्ये तर 27 शतकं कसोटीमध्ये झळकावली आहेत. विराट कोहलीला मागच्या अडीच वर्षापासून आपल्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आहे.विराटने आपलं शेवटचं शतक 22 नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. बांगलादेशविरुद्ध कोलकात्यामध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात विराटने हे शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराटने आतापर्यंत 70 डावात फलंदाजी केली आहे. यात टेस्ट, वनडे आणि टी 20 मधील सर्व सामने आहेत. त्यामुळे विराट मोहालीमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरेल, ती त्याची 71 वी इनिंग असेल.
कोणाला संधी मिळणार?
आजच्या सामन्यात मधल्याफळीतल्या दोन जागांसाठी तिघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे रोहित कोणाला निवडतो? त्याची उत्सुक्ता आहे. पूजारा-रहाणे नसल्यामुळे त्यांच्याजागी हनुमा विहारी, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांपैकी दोघांना संधी मिळू शकते. पूजारा आणि रहाणे ज्या क्रमांकावर खेळायचे, त्या ठिकाणी शुभमन गिल आणि हनुमा विहारीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. चेतेश्वर पुजारा खेळपट्टिवर टिकून रहायचा. प्रतिस्पर्ध्यांना सहजासहजी आपली विकेट बहाल करायचा नाही. तशी फलंदाजी हनुमा विहारी करु शकतो. त्याचा बचाव भक्कम आहे.