लखनऊ: वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) सीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या. इशान किशन (89), (Ishan kishan) श्रेयस अय्यर नाबाद (57) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) (44) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची खूपच खराब सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर भुवनेश्व कुमराने सलामीवीर पथुम निसांकाला शून्यावर बाद केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनेच दुसरा सलामीवीर कामिल मिसहाराला (13) धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
त्यानंतर श्रीलंकेकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. अपवाद फक्त चरित असालंकाचा त्याने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तत्पूर्वी भारताला सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्माने जबरदस्त सुरुवात करुन दिली. भारताचा पहिला विकेट 111 धावांवर गेला. रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्माने 32 चेंडूत 44 धावा केल्या.
1ST T20I. India Won by 62 Run(s) https://t.co/2bnp2Q8Gn5 #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2022
इशान किशनने आज मागच्या काही सामन्यातील अपयश धुवून काढलं. त्याने 56 चेंडूत त्याने 89 धावा केल्या. यात 10 चौकार आणि तीन षटकार होते. शनाकाने त्याला झेलबाद केले. भारताच्या तेव्हा दोन बाद 155 धावा झाल्या होत्या. इशान बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली व श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 28 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. या तिघांच्या बळावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
India vs Srilanka 1 st T 20 india won this match leading in series by 1-0