बंगळुरु: पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीचाही टीम इंडियाने (Team India) तीन दिवसात निकाल लावला आहे. भारताने दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा (India vs srilanka test) दुसरा डाव 208 धावात संपुष्टात आला. भारताने हा कसोटी सामना 238 धावांनी जिंकला. मोहाली कसोटीत (Mohali Test) टीम इंडियाने डावाने विजय मिळवला होता. दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. दुसऱ्याडावात श्रीलंकेकडून कॅप्टन दिमुथ करुणारत्नेने एकाकी झुंज दिली. त्याने 107 धावांची शतकी खेळी साकारली. जसप्रीत बुमरहाने त्याचा अडसर दूर केला. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्याडावात फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली. अश्विन, जाडेजा आणि अक्षर पटेलने मिळून सात विकेट घेतल्या. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्य़ा डावातही जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. त्याने तीन विकेट घेतल्या.
28 वर्षांनी मालिकेत क्लीन स्वीप
वनडे, टी-20 पाठोपाठ कसोटीतही रोहित शर्माने मालिका विजयाने सुरुवात केली आहे. रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. भारताने तब्बल 28 वर्षांनी श्रीलंकेला मालिकेत क्लीन स्वीप दिलं. दुसऱ्याडावात श्रीलंकेकडून कॅप्टन दिमुथ करुणारत्ने (107) आणि कुशल मेंडिस (54) यांनीच प्रतिकार केला. या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावून माघारी परतले.
बुमराह मदतीला धावून आला
श्रीलंकेचा डाव लांबतोय असं वाटत असतानाच जसप्रीत बुमराह मदतीला धावून आला. करुणारत्ने खेळपट्टीवर बराच वेळ होता. त्याला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांचा संघर्ष सुरु होता. अखेर जसप्रीत बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करुन भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. श्रीलंकेच्या शेपटाला बुमराह आणि अश्विनने फार वळवळू दिले नाही. त्यांनी झटपट श्रीलंकेचा डाव संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिका चार विकेट घेतल्या. जाडेजा एक आणि अक्षर पटेलने दोन विकेट काढून त्याला साथ दिली.
?????? ????? ?????????! ? ?@Paytm #INDvSL pic.twitter.com/Cm6KZg7y0s
— BCCI (@BCCI) March 14, 2022
भारताच्या विजयाचे तीन नायक
तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात गुंडाळल्यानंतर भारताने नऊ बाद 303 धावांवर आपला डाव घोषित केला. श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्याडावात भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. ऋषभने वनडे स्टाइल फलंदाजी करुन वेगाने धावा जमवल्या. त्याने 31 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार होते. भारताच्या दुसऱ्या कसोटी विजयात जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांची खेळी निर्णायक ठरली.