कांगडा: भारताचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) कांगडाच्या फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. इशानवर आता BCCI च्या मेडिकल टीमचं लक्ष असेल. आज श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना होणार आहे. इशानच्या खेळण्याबद्दल अजूनही सस्पेंस कायम आहे. काल भारत-श्रीलंकेदरम्यानच्या दुसऱ्या टी-20 (India vs Srilanka) सामन्यादरम्यान इशान किशनच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू (Bouncer ball) इशान किशनच्या डोक्याला लागला होता. खबरदारी म्हणून इशानला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेले असल्याने इशानला गंभीर इजा झाली नाही. इशानच्या डोक्याचं सीटी स्कॅनही करण्यात आलं. पण त्यात गंभीर दुखापत झाली नसल्याचं डॉक्टरांना आढळलं. इशानला जितक्या लवकर डिस्चार्ज दिलाय, त्यावरुन दुखापत गंभीर नसल्याचं दिसतय.
मालिकेत क्लीन स्वीपचा इरादा
आज धर्मशाळाच्या मैदानावर भारत-श्रीलंकेमध्ये तिसरा टी-20 सामना होणार आहे. मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरेल. वेस्ट इंडिज प्रमाणे श्रीलंकेविरुद्धची मालिकाही 3-0 ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. काल श्रीलंकेनं दिलेलं 184 धावांच डोंगराएवढ लक्ष्य भारताने सहज पार केलं. श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा आणि संजू सॅमसनच्या प्रभावी फलंदाजीच्या बळावर भारताने श्रीलंकेवर सात विकेट राखून आरामात मात केली.
श्रीलंकेचा खेळाडूही हॉस्पिटलमध्ये होता
इशान किशनशिवाय श्रीलंकेच्या दीनेश चंडीमललाही मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या हाताला मार लागला होता. त्याला सुद्धा फोर्टिस रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने रुग्णालयाभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इशानला लागलेल्या बाऊन्सर चेंडूचा वेग किती होता?
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराचा बाऊन्सर चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर आदळला होता. कुमाराने 147 KMPH वेगाने टाकलेल्या चेंडूवर इशान पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू इशान किशनच्या हेल्मेटवर येऊन आदळला. त्यानंतर इशान किशन काही वेळासाठी जमिनीवर बसला.हेल्मेटमुळे इशानला होणारी गंभीर दुखापत टळली. इशानला जोरात चेंडू लागल्याचं लक्षात येताच मदतीसाठी श्रीलंकेचे खेळाडू धावले.