मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर या सीरीज मधला पहिला सामना होत आहे. विजयाने सीरीजची सुरुवात करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ इंग्लंडचा दौरा (England Tour) आटोपून वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालाय. इंग्लंड दौऱ्यात टीन इंडियाने एजबॅस्टनचा एकमेव कसोटी सामना गमावला. पण टी 20 आणि वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी थोडा वेगळा संघ आहे. टीम इंडियातील सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे भारताचे प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
या मालिकेसाठी भारताचं नेतृत्व शिखर धवनच्या हाती आहे. दुसऱ्यांदा शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. मागच्यावर्षी श्रीलंका दौऱ्यात त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र, पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण, तो जखमी झाला आहे. यामुळे तो संघाच्या इनडोअर सराव सत्रातही सहभागी झाला नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळत नाहीय, त्याच्याजागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे.
भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.
The track for today at Queen’s Park Oval. #WIvIND pic.twitter.com/BN5Y3A8Gtz
— Windies Cricket (@windiescricket) July 22, 2022
क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
भारतः शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल