मुंबई: चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भारतीय संघ (Team india) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी जागा आणि संघ पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय संघ तीन आठवडे इंग्लंड (England) मध्ये होता. इंग्लंड मध्ये जय-पराजय अनुभवल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियाई दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आज म्हणजे 22 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होत आहे. भारतीय संघ आधी वनडे सीरीज नंतर पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज मधील पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये पहिला सामना आहे. त्रिनिदादच्या राजधानीमध्ये दोन दिवसापूर्वीच पावसाने आपलं दर्शन दिलं होतं. आज शुक्रवारी सुद्धा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारच्या पावसाने भारत आणि वेस्ट इंडिजच्या सराव सत्रात अडथळा आणला होता. त्यामुळे दोन्ही टीम्सना इन्डोर प्रॅक्टिस करावी लागली.
भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.
क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.