मुंबई: भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर (IND vs WI) विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 पुढे आहे. आता दुसरी वनडे जिंकण्यावर भारतीय टीमची (Team india) नजर आहे. रविवारी दोन्ही संघ आमने-सामने येतील. विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडिज (West indies) हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. हा सामना गमावल्यास वेस्ट इंडिजकडे मालिकेत पुनरागमनाची पुढची संधी नसेल. मायदेशात प्रतिष्ठा वाचवण्याचा वेस्ट इंडिजचा पुरेपूर प्रयत्न असेल. वेस्ट इंडिजसाठी दुसरी मॅच जिंकणं इतकं सोप नसेल. कारण टीम इंडियाने प्रत्येक विभागात त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेशकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियासमोर ते टिकणार नाहीत, असं बोललं जात होतं. पण असं झालं नाही. त्यांनी टीम इंडियाला जोरदार लढत दिली. अवघ्या 3 रन्सने भारताने हा सामना जिंकला.
दुसरा सामना जिंकल्यास भारताकडे मालिकेत विजयी आघाडी होईल. आपल्या नेतृत्वाखाली संघाने मालिका जिंकावी, अशी शिखर धवनची इच्छा असेल. भारताने या सीरीजसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय. पहिली वनडे जिंकली. आता दुसऱ्यावनडेत राहुल द्रविड, शिखर धवन काही बदल करतील का? हा प्रश्न आहे. पण राहुल द्रविड यांची पॉलिसी बघता, असा बदल ते करणार नाहीत. पहिल्या वनडेचाच संघ दुसऱ्या वनडेतही उतरवला जाईल.
वेस्ट इंडिजने सामना गमावला. पण त्यांनी भारतीय संघाला त्रास दिला होता. त्यांच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. फलंदाजीत त्यांनी चांगली टक्कर दिली. भारताच्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचल्यानंतर त्यांनी सामना गमावला. वेस्ट इंडिजही आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.
वेस्टइंडीजः निकोलस पूरन (कॅप्टन), शे होई, शामराह ब्रूक्स, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, रोवमन पावेल, जेडन सील्स, अल्जारी जोसफ, रोमारियो शेफर्ड, गुडकेश मोती, अकील होसैन.
भारतः शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल