कोलकाता: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात सलामीवीर इशान किशनकडून (Ishan kishan) अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. इशान किशन फ्लॉप ठरला. इशान किशन वेगवान गोलंदाज शेल्डर कॉटरेलच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला. इशान किशनने दहा चेंडूत फक्त दोन धावा केल्या. कॉटरेलने इशानला पहिले चार चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर आऊट केलं. चौथ्या चेंडूवर वेस्ट इंडिजने रिव्यू घेतला होता. पण त्याचा फायदा झाला नाही. चेंडू इशांतच्या बॅटला स्पर्श करुन विकेटकिपरकडे गेला असं, वाटलं. त्यामुळे पोलार्डने DRS चा आधार घेतला. पण रिव्यू वाया गेला. इशान किशन त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आऊट झाला. कॉटरेलने टाकलेला चेंडू बॅटच्या एजला लागला व बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या मेयर्सकडे सोपा झेल दिला. दहा चेंडूत इशानने फक्त दोन धावा केल्या.
मागच्या सामन्यातही इशानने सलामीला येऊन वेगात धावा केल्या नव्हत्या. त्याने 42 चेंडूत 35 धावांची खेळी केली होती. रोहितने सामना संपल्यानंतर इशानसोबत त्याच्या फलंदाजीबद्दल चर्चाही केली होती. रोहित बोलत होता, त्यावेळी इशान किशन हात बांधून मान खाली करुन सर्व काही गपचूप ऐकत होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात हा डावखुरा स्फोटक फलंदाज थोडा गोंधळलेला दिसला. त्यामुळे रोहित शर्माने त्याचा क्लास घेतला. इशान किशनने 35 धावा करण्यासाठी 42 चेंडू घेतले. अशी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित नाहीय. 83.33 इशान किशनचा स्ट्राइक रेट होता.
इशान किशन हा यंदाच्या आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं आहे. इशानची फलंदाजी पाहून निश्चित मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं असणार.
रोहित काय म्हणाला होता…
“खेळपट्टीवर जाऊन स्ट्राइक रोटेट करण्यावर लक्ष दे. इशानला फक्त थोड्या सामन्यांची आवश्यकता आहे. त्याच्यावर भरपूर दबाव आहे. इशान किशनला कुठलाही दबाव जाणवणार नाही, याची काळजी घेणं, आमचं काम आहे” असं रोहित शर्माने सांगितलं.