मुंबई: वनडे मालिका (ODI Series) विजयाने टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याचा शेवट केला. मँचेस्टर मधील या विजयामुळे टीम इंडियाचा आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याआधी आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. 22 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये सीरीज सुरु होत आहे. आधी वनडे आणि नंतर विंडिज विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच्या (T 20 World cup) दृष्टीने भारतीय संघासाठी ही सीरीज खूप महत्त्वाची आहे. या सीरीजसाठी दोन खेळाडूंच्या उपलब्धतेवरुन प्रश्न निर्माण होत आहेत. केएल राहुल आणि कुलदीप यादव हे ते दोन खेळाडू आहेत.
टीम इंडियाचे हे दोन्ही खेळाडू मागच्या दीड महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहेत. अजूनपर्यंत ते पूर्णपणे फिट झालेले नाहीत. सिलेक्टर्सनी दोघांना वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी संघात स्थान दिलं आहे. फिटनेसवर दोघांचा दौरा अवलंबून असेल, असं सुद्धा निवड समितीने स्पष्ट केलं होतं. याच आठवड्यात दोघांची फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यावर बरच काही अवलंबून असेल, अशी माहिती आहे.
दोघांची फिटनेस टेस्ट याच आठवड्यात होईल. दोघांची रिकव्हरी चांगली सुरु आहे. दोघेही लवकरच संघात परततील, अशी अपेक्षा आहे. कुलदीप 80 टक्के मॅच फिट आहे. राहुल रिकव्हर होतोय. त्याची सर्जरी झाली आहे. त्याने सराव सुरु केलाय. फिटनेसच्या आधारावरच निर्णय घेतला जाईल.
सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मागच्या महिन्यापासून दुखापतग्रस्त आहे. दोघांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीज साठी संघात निवड झाली होती. पण सीरीज सुरु होण्याआधीच त्यांना दुखापत झाली. राहुलची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला उपचारासाठी जर्मनीला जावं लागलं. सर्जरी यशस्वी झाली. तो मायदेशी परतला आहे. कुलदीप यादव बंगळुरुत NCA मध्ये रिहॅब प्रक्रियेमध्ये आहे.