वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर होणार आहे. या संघात कुलदीप यादवचे (kuldeep yadav) नाव निश्चित समजले जात आहे. या मालिकेपासून कुलदीपचे संघात पुनरागमन होत आहे. कुलदीप यादवची कारकीर्द गेल्या 2-3 वर्षात चढ- उतारांची राहिलेली आहे. गेल्या वर्षी तो गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्याचा संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव शिवाय रवी बिश्नोईचीही (ravi bishnoi) पहिल्यांदा टी-20 मालिकेसाठी निवड निश्चित समजली जात आहे. दरम्यान, भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले असले तरी टी-20 संघात त्याची निवड करण्यात आलेली नसल्याचीही माहिती मिळाली आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात कुलदीपला विशेष प्राधान्य दिले जात नव्हते पण आता तो संघातील ‘ट्रम्प कार्ड’ बनू शकतो. कुलदीपचे गेल्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते.
रोहितचा कुलदीपवर विश्वास
कुलदीप यादवच्या निवडीत कर्णधार रोहित शर्माचा मोठा हात असण्याचे सांगण्यात येत आहे. रोहित आता कर्णधार आहे आणि त्याला कुलदीपच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास आहे. कुलदीप यादवचा एकदिवसीय आणि टी-20 विक्रम अप्रतिम आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. T20 मध्येही कुलदीपने 23 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.
रवी बिश्नोई पहिल्यांदाच संघात
लेगस्पिनर रवी बिश्नोईला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे. अंडर 19 क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, बिश्नोईला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने संधी दिली होती. ज्यामध्ये त्याने 23 सामन्यांमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. बिश्नोईचा नुकताच लखनौच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
यांना जागा मिळाली नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर. अश्विन वेस्ट इंडिज मालिकेत खेळणार नाही. अश्विन पुढील दीड महिना विश्रांती घेणार आहे. रवींद्र जडेजा नक्कीच तंदुरुस्त आहे पण त्याला आणखी काही काळासाठी विश्रांती देण्यात येत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू ऋषी धवनलाही संधी मिळालेली नाही.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका अहमदाबाद येथे खेळवली जाणार आहे. हे सामने 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला होणार आहेत. त्याचबरोबर टी-20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला टी-20 सामने खेळवले जातील.