मुंबई: सततचे दौरे आणि मालिकांमुळे निवड समितीला भारतीय क्रिकेटपटुंच्या विश्रांतीचा विचार करावा लागत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) चा सीजन संपल्यानंतर 10 दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी 20 सीरीज सुरु झाली. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौरा एकाचवेळी आला. त्यामुळे दोन संघ निवडावे लागले. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. आता टी 20 आणि वनडे सीरीज सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 22 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात (India West Indies tour) भारतीय संघ एकूण आठ सामने खेळणार आहे. या सीरीजसाठी पुन्हा एकदा खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार सुरु झाला आहे. भारतीय संघाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. कोणा-कोणाला विश्रांती दिली जाईल, कोण-कोण खेळाडू असतील, ते अजून स्पष्ट नाहीय. बहुतांश सीनियर खेळाडूंना वेस्ट इंडिज सीरीजसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.
भारताचा वेस्ट इंडिज दौरा 22 जुलैपासून सुरु होणार आहे. या सीरीज मध्ये भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. 7 ऑगस्टला हा दौरा समाप्त होईल. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार या दौऱ्यासाठी टीमची घोषणा आधीच होणार होती. पण निवड समिती काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत आहे. सध्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा इंग्लंड मध्ये आहेत. ते संघ निवडीआधी संघातील सीनियर खेळाडूंशी चर्चा करतील.
निवड समिती आता रोहित शर्माला आराम देण्याच्या विचारात नसेल. आयपीएल 2022 सीरीज संपल्यापासून रोहित विश्रांती घेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्याच्या सीरीजसाठी रोहितला विश्रांती दिली होती. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो एजबॅस्टन कसोटीतही खेळू शकला नाही.
आता रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. 7 जुलैपासून ही सीरीज सुरु होईल. 12 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाईल. वनडे सीरीजचे पहिले दोन सामने ओवल आणि लॉर्ड्सवर 12 जुलै आणि 14 जुलैला खेळले जातील. सीरीजमधला शेवटचा सामना 17 जुलैला मँचेस्टर येथे होईल.