मेलबर्न: टीम इंडियाने आज सुपर 12 राऊंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवला. टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून पराभव झाला. त्यामुळे या मॅचआधीच टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. फक्त ग्रुपमध्ये टॉपवर राहणार का? हा प्रश्न होता. टीम इंडिया ग्रुपमध्ये टॉपवर आहे.
झिम्बाब्वेने किती रन्स केल्या?
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवन 25 चेंडू नाबाद 61 आणि केएल राहुल 51 यांच्या बळावर टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. झिम्बाब्वेचा डाव 115 धावात आटोपला.
टीम इंडियाने झिम्बाब्वेला दबावाखाली ठेवलं
आजच्या मॅचमध्ये सुरुवातीपासून टीम इंडियाने झिम्बाब्वेला धक्के दिले. त्यांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने 35 आणि सिकंदर रझाने 34 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेला धक्का दिला. भारताकडून हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, रविचंद्रन अश्विनने 3, आणि भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षरने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
ग्रुपमध्ये टीम इंडिया टॉपवर
टीम इंडियाने सुपर 12 राऊंडमध्ये फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. पाकिस्तान, नेदरलँड्स, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच जिंकून ग्रुपमध्ये 8 पॉइंटससह टॉपवर राहिले.
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाबरोबर?
सेमीफायनलमधील चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रुप 1 मधील टॉप टीम ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टॉप टीम ग्रुप 1 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे. म्हणजे टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान न्यूझीलंडला भिडणार आहे.